बिहारमध्ये ६० वर्षांवरील वृद्धांना मिळणार पेन्शन

0
488

पटणा, दि. १५ (पीसीबी) – बिहारमध्ये ६० वर्षांवरील सर्व वृद्ध व्यक्तींना पेन्शन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतला आहे. ६० वर्षावरील वृद्धांना पेन्शन देणारे बिहार हे देशातील पहिले राज्य बनले आहे. बिहार सरकारने शुक्रवारी ‘युनिव्हर्सल ओल्ड एज पेन्शन स्कीम’ लाँच केली आहे. या योजनेअंतर्गत वृद्धांना दरमहा ४०० रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेचा लाभ सर्व समाजातील वयोवृद्धांना मिळणार आहे.

केंद्र किंवा देशातील एकही राज्य सरकार वृद्धांना पेन्शन देत नाही. काही राज्य बीपीएल कुटुंबातील व्यक्तींना, एससी/एसटी, विधवा महिला आणि अपंग व्यक्तींना पेन्शन देते. परंतु, सर्व वृद्धांना पेन्शन देणारे बिहार राज्य हे पहिले राज्य बनले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी समाजकल्याण विभागाच्या एका कार्यक्रमात या योजनेचे उद्धाटन केले. या योजनेमुळे राज्यातील ३५ ते ३६ लाख वयोवृद्धांना लाभ मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. वयोवृद्धांना पेन्शन सुरू केल्याने राज्याच्या तिजोरीवर १८०० कोटीचा अतिरिक्त भार पडणार आहे.

ज्यावेळी मी ग्रामीण भागाचा दौरा करतो त्यावेळी असंख्य वयोवृद्ध माझ्याकडे येऊन मला सांगतात की बीपीएलच्या यादीत नाव नसल्याने आम्हाला पेन्शन मिळत नाही. त्यामुळे मी हा निर्णय घेतला, असे नितीश कुमार यांनी सांगितले. २०१९-२० या वर्षासाठी मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजनेसाठी ३८४ कोटी रुपये मंजूर केल्याची माहितीही नितीश कुमार यांनी दिली.