Desh

बिहारनंतर ‘या’ भागातही नदीत तरंगताना दिसले मृतदेह

By PCB Author

May 11, 2021

उत्तरप्रदेश,दि.११(पीसीबी) – बिहारच्या बक्सरनंतर आता उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्येही गंगा नदीच्या किनाऱ्यावर मृतदेह तरंगताना आढळले आहेत. मंगळवारी गाझीपूरच्या गंगा नदीच्या तटावर काही मृतदेह दिसून आल्यानं खळबळ उडाली. गाझीपूर आणि बक्सर दरम्यान जवळपास ५५ किलोमीटरचं अंतर आहे.

बिहारच्या बक्सरमध्ये सोमवारीर ४० ते ४५ मृतदेह तरंगताना दिसले होते. यानंतर हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत आल्याचा अंदाज वर्तवला होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बिहारमध्ये मृतदेह पाण्यात वाहण्याची प्रथा – परंपरा नाह. उत्तर भारतातील ग्रामीण भागांत करोना संक्रमण तेजीनं फैलावताना दिसत आहे. त्यामुळे, यातील अनेक मृतदेह कोविड संक्रमित असल्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

करोना संक्रमणानं रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी भीतीमुळे हे मृतदेह नदीत सोडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक गावांमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना करोना नियमांचा अभाव दिसून येत आहे. अशावेळी करोना संक्रमित मृतदेह पाण्यात सोडल्यानं अनेक प्रकारच्या गंभीर धोक्यांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे संक्रमण आणखीन तेजीनं फैलवण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.