Pimpri

बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दारू पित बसले असताना; झालं असं काही…

By PCB Author

May 20, 2021

चिंचवड, दि. २० (पीसीबी) दारू पीत असताना दोन मित्रांमध्ये भांडण झाले. त्यातून एका मित्राने दुसऱ्या मित्राला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. १६) दुपारी आनंदनगर, चिंचवड येथे घडली. अनंता मनोज भडकवाड (वय २२, रा. हडपसर, पुणे) असे मारहाण झालेल्या मित्राचे नाव आहे. त्यांनी याबाबत बुधवारी (दि. १९) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजीत गवळी (रा. आनंदनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी तोंड ओळखीचे मित्र आहेत. रविवारी दुपारी दोघेजण आनंदनगर येथील मोकळ्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दारू पिण्यास बसले होते. त्यावेळी दारूच्या नशेत दोघांचे भांडण झाले. त्यानंतर आरोपी अभिजीत तिथून निघून गेला. काही वेळानंतर आरोपी अभिजीत पुन्हा फिर्यादी बसलेल्या ठिकाणी लाकडी दांडके घेऊन आला. त्याने फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. फिर्यादी यांचा पाय फ्रॅक्चर झाला. फिर्यादी आरडाओरडा करत असताना आरोपीने पुन्हा त्यांना मारून गंभीर जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.