बिल्डरकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकारासह पाच जणांवर गुन्हा दाखल

0
335

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – शहरातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत रास्ता पेठेतील जागा आणि 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यातील पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेला कर्मचारी, एक पत्रकार आणि शहरासह जिल्ह्यात आरटीआय कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध असणाऱ्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, इतरांचा शोध सुरु आहे. दरम्यान याप्रकरणानंतर शहरात प्रचंड खळबळ माजली आहे.

याप्रकरणी अमोल सतीश चव्हाण, आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बराटे, शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन आणि एका महिलेवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुधीर कर्नाटकी (वय 64) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दरम्यान त्यांची आणि यातील आरोपी महिलेची एका कार्यक्रमात ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यावेळी ओळखीतून त्यांनी महिलेला बावधन परिसरात एक फ्लॅट भाडे तत्त्वावर घेऊन दिला. त्यानंतर हा फ्लॅट दोघांच्या नावावर केला. मात्र यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. तिने फिर्यादी यांना कोणत्याही गुन्ह्यात अडकवू शकते असे म्हणत पैश्यांची मागणी सुरू केली. तसेच तिच्या पाठीमागे रवींद्र बराटे, शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन अश्या व्यक्ती असल्याचे सांगत धमकावत होती. त्यानंतर तिने 6 लाख रुपये मागत बावधन येथील फ्लॅट नावावर करण्याचा तगादा लावला. तसेच बराटे हा मोठा माणूस असून, त्याचे मोठ्या राजकीय व्यक्तींशी संबंध आहेत. तर शैलेश जगताप याचे पोलीस दलात ओळखी आहेत. तसेच जैन हा पत्रकार असून, तो बातमी देऊन सर्वत्र बदनामी करेल असे सांगत धमकावले. तर फ्लॅट व पैसे देण्याचे लिहून घेतले. त्यांनी स्टॅम्प पेपरवर करारनामा करून घेतला. त्यानंतर फिर्यादी खरेदीसाठी बाहेर गेले असता आरोपी महिला व चव्हाण या दोघांनी त्यांना अडविले. तसेच फ्लॅट व 6 लाख यासोबतच 2 कोटी रूपये देण्याची मागणी सुरू केली. तसेच 2 कोटी व रास्ता पेठेतील जागा द्यावी लागेल यासाठी तुम्ही पुढचे बोलणे देवेंद्र जैन आणि शैलेश जगताप यांच्याशी बोला असे देखील सांगत त्यांना धमकावले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर पत्रकार जैन याने फिर्यादी यांना फोनकरून त्यांना भेटायला बोलावले. त्यावेळी फिर्यादी हे जैन यांच्या व फिर्यादी याच्या कॉमन मित्रा मार्फत जैन यांना भेटण्यास गेले. त्यावेळी जैन यांनी पैसे तसेच रास्ता पेठेतील जागा द्या. अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. बातमी दिल्यानंतर बदनामी होईल. तर यात शैलेश जगताप, बराटे आणि चव्हाण अशी लोक आहेत. हे काय तुम्हाला सोडणार नाहीत. तुमचा मुडदा पडतील असे सांगत त्यांना धमकावले. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांना रस्त्यावरून जात असताना महिलेचे प्रकरण मिटवा अन्यथा महागात पडेल अशी धमकी दिली होती. त्याने हेल्मेट घेतले असल्याने फिर्यादी यांना ते ओळखू आले नाही. त्याबाबत त्यांनी त्यावेळी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र फिर्यादी हे आरोपींच्या धमक्यांना घाबरले नाही. त्यांनी पैसे आणि फ्लॅट नावावर करून न देता रास्ता पेठेतील जागा देखील दिली नाही.

याचा बदला म्हणून फिर्यादी यांच्यावर यातील आरोपी महिलेने इतर आरोपींच्या मदतीने कट रचून हिंजवडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर फिर्यादी यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या गुन्ह्यानंतर पोलीस दलासोबतच सामाजिक, राजकिय आणि व्यापारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी पत्रकार देवेंद्र जैन, पोलीस दलातून बडतर्फ केलेला शैलेश जगताप आणि महिला आरोपी यांना ताब्यात घेतले आहे. तर आरटीआय कार्यकर्ते बराटे व सतीश चव्हाण यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले. याप्रकरणात शैलेश जगताप, देवेंद्र जैन आणि आरोपी महिला अश्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतरांचा शोध घेतला जात असून, पुढील तपास सुरू आहे.