बिबट सफारीबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश

0
313

पुणे, दि. २३(पीसीबी), : जुन्नर परिसरात बिबट सफारी व्हावी आणि त्यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून जिल्हा प्रशासनाने बिबट सफारीबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपये उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

जुन्नर तालक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्र, खामगांव येथे वन्यजीव मल्टिस्पेशॉलिटी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, मुख्य वनसंरक्षक एन.आर प्रवीण, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक अमित भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निखील बनगर आदी उपस्थित होते.

रुग्णालयात वन्यजीव प्राण्यावर करण्यात येणाऱ्या उपचार पद्धती व त्यासाठी येथे उपलब्ध असलेली अत्याधुनिक साधनांची माहिती घेऊन समाधान व्यक्त करून श्री.पवार म्हणाले, वसुंधरेच्या रक्षणासाठी वने, वन्यजीव, पर्यावरण संवर्धन महत्वाचे आहे. त्यामुळे वन्यजीव संरक्षणासाठी राज्यातील पहिले अत्याधुनिक रुग्णालय महत्वाचे ठरणार आहे. माणसाच्या जीवाप्रमाणे वन्यप्राण्यांच्या जीव देखील महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. वन्यजीव, पक्षी, कीटक जैवविविधतेचे महत्त्वाचे घटक असून ते आपल्या सृष्टीचा भाग आहेत. मानवाच्या अस्तित्वासाठी जैवविविधतेचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.

जुन्नर तालुक्यात निसर्गाचे वरदान असून वनराईचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात महत्वाचे ५ सिंचन प्रकल्प असल्यामुळे सिंचनाची क्षमता वाढलेली आहे. ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असून ऊसाच्या क्षेत्राच्या माध्यमातून बिबट्याला सुरक्षित निवारा, खाद्य मिळत असल्याने त्यांना सुरक्षित वाटते. यामुळे मनुष्य आणि प्राणी यांचा होणारा संघर्ष टाळून जीवितहानी टाळण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावे. राज्य शासन यासाठी सर्व सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते येथील आदिती आणि शिवश्री कक्षाचे नामकरण करण्यात आले.