बिजलीनगर गिरीराज परिसरात रात्री ९ वा. पाणीपुरवठा, नागरिक त्रस्त

0
265

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – गिरीराज हाऊसिंग कॉम्प्लेक्स व शाहू उद्यान परिसर बिजलीनगर, चिंचवड या भागात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे अपुर्‍या, अनियमित व अवेळी होत असलेल्याने नागरिक त्रस्त आहेत. या संदरभात महापालिका आयुक्त, पाणीपुरवाठा विभाग यांना वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. अत्यंत गैरसोय म्हणजे रात्री ९ वाजता पाणी येते ते पहाटे २ पर्यंत असते, ती वेळ सकाळची करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून आम्हाला अपुरा, अनियमित व रात्रीच्या वेळेत पाणीपुरवठा होत असून सदर पाणीपुरवठ्याची वेळ ही रात्री ९ ते पहाटे २ ते ३ वाजेपर्यंत अशी केली गेलेली आहे. पाणी पुरवठयातील वेळेच्या नियोजनात वरीलप्रमाणे बदल करत असताना नागरीकांना विश्वासात घेणे आवश्यक होते परंतु नागरीकांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता, कोणत्याही प्रकारचा सर्वे न करता किंवा नागरिकांच्या हरकती न मागवता सदर बदल केला गेलेला आहे.

या भागात बैठी घरे अत्यंत कमी असून इमारतींचे प्रमाण हे अधिक असल्याने व महानगरपालिकेतर्फे रात्री होणारा पाणीपुरवठा हा सुरूवातीला अत्यंत कमी दाबाने होत असल्याने इमारतीमध्ये वरील मजल्यांवरील लोकांपर्यंत हे पाणी साधारण २ ते ३ तास उशिराने पोहोचते. व त्यामुळे पाणी भरून ठेवण्यासाठी लोकांना एकदिवस आड रात्री उशिरापर्यंत जागावे लागत आहे व याचा विपरीत परिणाम येथील नागरिकांच्या दिनचर्येवर व आरोग्यावर होत आहे. प्रभागातील इतर भागात योग्य वेळेत पाणीपुरवठा होत असून फक्त या भागातच रात्री उशिराने पाणीपुरवठा होत आहे. १०० टक्के अधिकृत नळजोडणी असलेला भाग असून सर्व नागरिक नियमित व निर्धारित वेळेत पाणी पट्टी भरत आहेत. असे असताना सुद्धा पाण्यासाठी येथील नागरिकांना झगडावे लागणे हे अत्यंत खेदजनक व कुठेतरी नागरिकांमध्ये भेदभाव करण्यासारखे वाटत आहे, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे साधारणपणे ५०० ते ५५० एमएलडी (MLD) पाणी हे पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांसाठी विविध प्रकल्पातून घेतले जाते तसेच महराष्ट्र जलसंपदा विकास प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार ५० लक्ष किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेने नागरिकांना १३५ एल पी सी डी (LPCD) पाणी पुरवठा करणे हे बंधनकारक आहे. असे असताना रोज पाणीपुरवठा होणे हे अपेक्षित आहे परंतु सध्या होत असलेल्या एक दिवस आड पाणीपुरवठ्यात सुद्धा रात्री उशिराने पाणी पुरवठा होणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. आमच्या भागातील इमारती ह्या साधारणपणे २० ते २५ वर्ष जुन्या असल्याने त्यावेळेच्या लोकसंख्येचा व परिस्थितीचा विचार करून पाणी संकलनाची व्यवस्था केली गेलेली आहे त्यामुळे सदर इमारतीतील सभासदांच्या संख्येनुसार इमारतीची पाणी साठवण्याची क्षमता ही फक्त एक दिवस (साधारणपणे दिवसातील ४ ते ५ तास) पुरेल एवढीच आहे असे असताना एक दिवस आड व रात्री उशिराने पाणी आल्याने नागरिकांना साठवलेले पाणी दोन दिवस वापरावे लागत आहे व त्यामुळे पाणी कितीही काटकसरीने वापरले तरीही अपुरे पडत आहे. सध्य स्थितीत शहरात रोज पाणी पुरवठा करणे हे शक्य नाही ह्याची आम्हाला कल्पना आहे व आपणही ते विविध माध्यमातून सांगीतलेले आहे परंतु एक दिवस आड होत असलेला पाणी पुरवठा हा फक्त रात्री अपरात्री न करता योग्य व मानवी वेळेत करावा हीच आमची आपणाकडे विनंती आहे, असे निवेदनात म्हटले आहे.