‘बिग बॉस मराठी २’फेम नेहाने स्वच्छ केला समुद्र किनारा!

0
434

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – देशभरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर अनंत चतुर्दशीदेखील तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरी करण्यात आली. मात्र सध्याच्या घडीला अनेकजण पिओपीच्या मूर्तीला प्राधान्य देतात. या मूर्ती विसर्जन केल्यानंतरही त्या पाण्यामध्ये विरघळत नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर समुद्र किनारा, नदी, तलाव यांच्यामध्ये जलप्रदूषण होते.त्यासोबतच अनेक जण बाप्पाला निरोप देण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी कचरा करतात. त्यामुळेच आता विसर्जनानंतर अनेक समाजिक संस्था तसेच मराठी चित्रपसृष्टीतील काही कलाकार समुद्र किनाऱ्यावर स्वच्छ मोहिम राबवत आहेत. यामध्ये ‘बिग बॉस मराठी २’फेम अभिनेत्री नेहा शितोळेनीही पुढाकार घेतला आहे.

नेहाने मुंबईतील सामाजिक संस्था अलर्ट सिटीजन फोरम, (रजि.) व नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् (महाराष्ट्र) संयुक्तपणे द सोशल हूट यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या जुहू येथील समुद्र किनारा सफाई मोहिमेमध्ये सहभाग घेतला. यावेळी तिने जुहू समुद्र किनाऱ्यावरील कचरा, प्लास्टिक उचलून या मोहिमेत खारीचा वाटा उचलला.

लाखोंच्या संख्येने मुंबईतील जुहू बीच येथे घरगुती व सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन केले जाते. मात्र समुद्र मानवनिर्मित वस्तू कधीच त्याच्या पोटात ठेवत नाही, विसर्जन केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, निर्माल्य आणि मुख्य म्हणजे पर्यटकांमार्फत आलेल्या प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणावर समुद्र किनारे दरवर्षी प्रदूषित होत असतात. त्यामुळेच नेहाने या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला घेत किनाऱ्याची स्वच्छता केली. विशेष म्हणजे तिच्याप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे विज यांनीदेखील काही दिवसापूर्वी समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.