‘बिग बॉस मराठी’ स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटक; सातारा पोलिसांची कारवाई

0
622

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – ‘बिग बॉस मराठी’ सीझन २ मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटक करण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत आले आहेत. साताऱ्यातील एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस लवकरच बिग बॉसच्या सेटवर पोहोचणार आहेत.

चेक बाऊन्स प्रकरणात सातारा कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत दाखल झाले आहे. बिग बॉस मराठीचा सेट मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आहे. त्यामुळे सातारा पोलिसांनी अटकेच्या कारवाईसाठी मुंबई पोलिसांची मदत मागितली आहे.

अटक केल्यानंतर बिचुकलेंना कोर्टात हजर करावे लागणार आहे. त्यामुळे अभिजीत बिचुकले स्पर्धेत कायम राहणार की इथेच त्याचा घरातील प्रवास संपणार, तसंच यावर कलर्स मराठी वाहिनी काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

दरम्यान, अभिजीत बिचुकलेने बिग बॉसच्या घरातील सहस्पर्धक आणि अभिनेत्री रुपाली भोसलेला शिवीगाळ केली होती. कलर्स वाहिनीवरील बिग बॉस मराठीच्या २४ व्या भागात हा प्रकार घडला होता. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेला शोमधून हकालपट्टी करा, अशी मागणी  केली होती. अभिजीत बिचुकले हे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असलेला एकमेव राजकीय नेता आहे. अभिजीत बिचुकले घरातील वादामुळे कायमच चर्चेत असतो, आता या नव्या वादाची त्यात भर पडली आहे.