‘बिग बॉस’मधून बिचुकलेंना हाकला; भाजपाच्या माजी नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
580

मुंबई, दि. २० (पीसीबी) – बिग बॉस मराठीच्या घरातून अभिजित बिचुकले यांना हाकला अशी मागणी भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अभिजित बिचुकलेंनी सहकलाकार रूपाली भोसले हिच्या घटस्फोटाचा उल्लेख करत तिच्या चारित्र्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा रितू तावडे यांनी केला आहे. बिचुकले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे एकल पालक महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्त्या यांचा अपमान होत असल्याचा आरोपही रितू तावडे यांनी केला असून बिचुकलेंची हकालपट्टी करण्याची मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

एवढंच नाही तर अभिजित बिचुकले आणि संबंधित वाहिनीवर कारवाई केली नाही तर आपण आंदोलन करू असाही इशारा रितू तावडे यांनी दिला आहे. बिग बॉस मराठीच्या २४ व्या भागात ही रूपाली भोसले आणि बिचुकले यांची वादावादी झाली. त्यावेळी अत्यंत हिन शब्दात बिचुकले यांनी रूपाली भोसलेवर शेरेबाजी केली.

नेमके काय घडले?

बिग बॉस मराठी घरातल्या सदस्यांना १ ते १० या क्रमांकांवर उभे राहण्याचा टास्क दिला. अभिजित केळकर पहिल्या क्रमांकावर जाऊन उभा राहिला. किशोरी शहाणे दुसऱ्या क्रमांकावर जाऊन उभ्या राहिल्या. नेहा शितोळे तिसऱ्या तर अभिजित बिचुकले चौथ्या स्थानावर जाऊन उभे राहिले. प्रत्येकाने आपण कोणता क्रमांक का निवडला आहे याचे स्पष्टीकरण द्यायचे होते. रुपाली भोसलेला सातव्या क्रमांकावर उभे रहावे लागल्याने तिने सगळा राग बिचुकलेंवर काढला. ते कसे खोटे बोलले, त्यांनी इतरांची फसवणूक कशी केली हे सांगायला सुरूवात केली. मात्र बिचुकलेंनी आरोप फेटाळले, ज्यानंतर रूपाली भोसलेने बिचुकलेंना मुलीची शपथ घेण्यास सांगितले. हे ऐकल्यानंतर तिळपापड झालेल्या बिचुकलेंनी रूपाली भोसलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. शिव्यांचा भडीमार करतानाच त्यांनी चौथा क्रमांक सोडला जो रूपाली भोसलेने पटकावला.

याच सगळ्या प्रकारावरून आता भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे आक्रमक झाल्या आहेत. बिचुकलेंनी महिलांचा अपमान केला आहे त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.