Maharashtra

बिग बींनी धरले सिंधुताई सपकाळांचे पाय!

By PCB Author

August 23, 2019

मुंबई, दि. २३ (पीसीबी)- ‘कौन बनेगा करोडपती’ आणि अमिताभ बच्चन हे आजच्या घडीला एक घट्ट समीकरण झालं आहे. त्यामुळे या शोच्या अकराव्या पर्वातही सूत्रसंचालक म्हणून अमिताभ बच्चन त्याच उत्साहाने प्रेक्षकांसमोर आले. या शोने आतापर्यंत अनेकांना प्रसिद्धी आणि पैसा असे दोन्हीही भरभरुन दिले आहे. त्यामुळे या शोचे प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा आहे. या शोमध्ये सामान्य माणसांपासून दिग्गज सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी हजेरी लावली आहे. या शोमध्ये पहिला ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’ असणार आहे. या एपिसोडमध्ये काही मान्यवर व्यक्तींना आमंत्रित करण्यात येते. त्यामुळे यंदा होणाऱ्या या भागात कोणती दिग्गज व्यक्ती येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. त्यातच ‘केबीसी’ने एक व्हिडीओ शेअर करुन या भाग ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ या हजेरी लावणार असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे हा शो सुरु असताना बिग बी सिंधुताईंच्या पाया पडले, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमध्ये एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अमिताभ बच्चन यांचा आजही कलाविश्वामध्ये दरारा आहे. लोकप्रिय आणि तितकेच प्रसिद्ध असलेले बिग बी कलाविश्वातील महानायक म्हणून ओळखले जातात. मात्र अशी ख्याती असतानाही बिग बींनी ‘केबीसी’च्या सेटवर सिंधुताई सपकाळांचे पाय धरले. परंतु बिग बींनी असे करण्यामागे एक खास कारण आहे.

सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या एपिसोडचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. केबीसीच्या सेटवर सिंधुताई सपकाळ यांनी हजेरी लावल्यानंतर बिग बींनी त्यांना पाया पडून नमस्कार केला आणि केबीसीच्या सेटवर त्यांचे स्वागत केले. सिंधुताई यांचे समाजकार्य फार मोठे आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी असलेल्या आदरामुळे बिग बींनी त्यांना पाया पडून नमस्कार केला.