Chinchwad

बावधानमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा

By PCB Author

October 05, 2018

हिंजवडी, दि. ५ (पीसीबी) – पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्यू करुन हुंड्याची मागणी करत पोटच्या तीन वर्षाच्या मुलीला मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बावधन खुर्द येथे २९ मे २०११ पासून शुक्रवार (दि. ४) या कालावधीत घडली.

याप्रकरणी पीडित ३० वर्षीय विवाहितेने पती योगेश विजयसिंग राजपुत, सासरे विजयसिंग मानसिंग रापुत दिर भगतसिंग विजयसिंग राजपुत, प्रतापसिंग विजयसिंग राजपुत, विकास विजयसिंग राजपुत आणि गायत्री विकास राजपुत या सहा जणांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार पतीसह सासरकडच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३० वर्षीय विवाहितेचा २०११ साली विवाह झाला. विवाहावेळी पतीला हुंडा म्हणून १० लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार पीडित विवाहितेच्या वडिलांनी तीन लाख रुपये रोख रक्कम आणि १४ तोळे सोन्याचे दागिने दिले होते. त्यानंतर देखील सासरच्या लोकांची हुंड्याची भूक भागली नाही. सर्वानी मिळून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. दरम्यान विवाहितेला मुलगी झाली. तरीही पतीकडून तिचा छळ वाढत गेला. पतीने विवाहिता आणि तिच्या तीन वर्षाच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. याप्रकरणी विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.