Chinchwad

बावधनमध्ये फ्लॅटचा ताबा वेळेत न दिल्याने बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा

By PCB Author

June 12, 2019

बावधन, दि. १२ (पीसीबी) – नव्या फ्लॅटसाठी २ कोटी २९ लाख ८४ हजार २०० रुपये भरुनही वेळेवर फ्लॅटचा ताबा न दिल्याने दोन बांधकाम व्यावसायिकांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बावधन खुर्द येथे घडली.

याप्रकरणी रणजित हेमचंद्र ओक (वय 46, रा. पाषाण रोड, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्व्हल ओमेगा बिल्डर्स प्रा. लि.चे संचालक विश्वजित झंवर आणि महेश बन्सीलाल लड्डा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्व्हल ओमेगा या बांधकाम कंपनीची बावधन खुर्द येथे मार्व्हल सेल्हा रिज इस्टेट ही बांधकाम साईट सुरु आहे. त्या प्रोजेक्टमध्ये रणजित यांनी २०१३ साली ४३२.०५ चौरस फुटांचा एक फ्लॅट खरेदी केला. त्यासाठी रणजित यांनी बांधकाम व्यावसायिकाला २ कोटी २९ लाख ८४ हजार २०० रुपये दिले. रणजित यांनी बावधन खुर्द येथील बांधकामासाठी दिलेले पैसे बांधकाम व्यवसायिकाने इथे न वापरता दुसरीकडे वापरले. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या मुदतीत रणजित यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. यामुळे रणजित यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.