Chinchwad

बावधनमध्ये दिवसाढवळ्या घरात घुसून महिलेच्या अंगावरील पावणेतीन लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

By PCB Author

July 22, 2019

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – महिला घरात एकटीच असताना अज्ञात चोरटा दिवसाढवळ्या घरात शिरला. त्याने महिलेचे तोंड दाबून मारुन टाकण्याची धमकी देत गळ्यातील, कानातील, हातातील आणि पायातील सोने-चांदिचे दागिने असा एकूण २ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना रविवारी (दि.२१) दुपारी साडेतीनच्या सुमारास फ्लॅट क्र.७, दसरा मजला, दगडे पाटील व्हीला, पाटीलनगर, बावधन बुद्रुक येथे घडली.

याप्रकरणी चंद्रभागा उत्तम दगडे (वय ४८, रा. फ्लॅट क्र.७, दसरा मजला, दगडे पाटील व्हीला, पाटीलनगर, बावधन बुद्रुक) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्यादी चंद्रभागा या त्यांच्या राहत्या घरी एकट्याच होत्या. यावेळी तोंडाला रुमाल बांदून अज्ञात चोरटा त्यांच्या घरात शिरला. त्याने चंद्रभागा यांचे तोंड दाबून, “आवाज केला तर मारुन टाकीन”, अशी धमकी दिली. तसेच चंद्रभागा यांच्या गळ्यातील, कानातील, हातातील आणि पायातील सोने-चांदिचे दागिने असा एकूण २ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हिंजवडी पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.