बाळ बोठेचा शोध आता परराज्यात घेणार? पोलिसांचा न्यायालयात अर्ज

0
209

अहमदनगर, दि.२ (पीसीबी): यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झालाय. मात्र, अद्यापही या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक झालेली नाही. याप्रकरणी आता पत्रकार बाळ बोठेच्या स्टँडिग वॉरंटसाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. जर न्यायालयाने पोलिसांचा अर्ज मान्य केला तर वॉरंट मिळाल्यानंतर पोलिसांना राज्यासह इतर राज्यांतही आरोपीचा शोध घेण्यास मदत होणार आहे.

रेखा जरे यांच्या हत्येला महिना उलटूनही आरोपी बाळ बोठेला अटक नाहीच
रेखा जरे यांच्या हत्येला महिना उलटुनही आरोपी बाळ बोठेला अद्याप अटक झालेली नाही. त्याविरोधात अहमदनगरमध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी या विरोधात अहमदनगर शहरात कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेला लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही करण्यात आली. नगरमधील विविध स्वयंसेवी संघटनांनी हा कँडल मार्च काढला होता.
बाळ बोठेचा पाय आणखीच खोलात, आता विनयभंग, खंडणीचा गुन्हा दाखल
रेखा जरे हत्याकांडमधील फरार आरोपी बाळ बोठेचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. सुपारी, हत्या आणि विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता त्याच्यावर खंडणीचाही गुन्हा दाखल झाला आहे. नोकरी घालवण्याची भीती घालून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप एका महिलेने केला असून नगरच्या तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये बोठेवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला.
बाळ बोठेला मदत करणारा संशयित पोलिसांच्या ताब्यात

रेखा जरे हत्याप्रकरणाच्या तपासात पोलिसांना एक मोठं यश मिळालंय. पोलिसांनी या प्रकरणातील फरार आरोपी बाळ बोठे याला मदत करणाऱ्या संशयिताला 27 डिसेंबरला पुण्यातून ताब्यात घेतलं. या संशयिताकडून बाळ बोठेच्या ठावठिकाण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशयिताचे नाव निलेश शेळके असे आहे. निलेश शेळके हा डॉक्टर असून तो गेल्या अडीच वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर नगरमधील बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय, पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. पोलीस सध्या बाळ बोठे याचा कसून शोध घेत आहेत. याच कारवाईदरम्यान पोलिसांनी शुक्रवारी पुण्यातून निलेश शेळके याला ताब्यात घेतले. पोलिसांचे पथक बाळ बोठेला पकडण्यासाठी गेले होते. तेव्हा निलेश शेळके पोलिसांच्या हाती लागला.

नेमकं प्रकरण काय?
रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या असल्यामुळे रेखा जरे हत्या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.
रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली