Maharashtra

बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचा वाद संपुष्टात; जयदेव ठाकरेंची याचिका मागे

By PCB Author

November 02, 2018

मुंबई, दि. २ (पीसीबी) – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात आला आहे. बाळासाहेबांच्या इच्छापत्राला आव्हान देणारी याचिका जयदेव ठाकरे यांनी मागे घेतली आहे. हा खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नाही, असे त्यांनी हायकोर्टाला कळवले आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छापत्राला जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. या खटल्यात शुक्रवारी जयदेव ठाकरे यांनी हायकोर्टात अर्ज दिला. खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नाही, त्यामुळे याचिका मागे घेत असल्याचे त्यांनी हायकोर्टात सांगितले. याचिका मागे घेतल्याने ठाकरे बंधूंमध्ये बाळासाहेबांच्या संपत्तीवरून सुरू असलेला वाद संपुष्टात आल्याचे दिसते.

उद्धवने बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा उठवत त्यांची मालमत्ता हडपल्याचा दावा करत जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान जयदेव यांनी काही गौप्यस्फोट केल्यानंतर प्रकरणाची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ करण्यात आली होती. बाळासाहेब त्यांच्या मालमत्तेतील वाटा मला द्यायला तयार होते. ही बाब खुद्द बाळासाहेबांनीच मला सांगितली. मात्र त्यावरून उद्धव आणि माझ्यात वाद नको म्हणून उद्धव याच्याकडे त्याबाबत वाच्यता न करण्याचेही त्यांनी मला सांगितले होते. परंतु त्याआधीच म्हणजे २०११ मध्ये उद्धवने काही कागदपत्रांवर बाळासाहेबांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. ती कागदपत्रे कशाबाबत होती हे खुद्द बाळासाहेबांनाही माहीत नव्हते, असे त्यांनी सुनावणीदरम्यान हायकोर्टात सांगितले होते.