Maharashtra

बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेविषयी छगन भुजबळांकडून मोठा गौप्यस्फोट

By PCB Author

June 14, 2018

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या आदेशाची फाईल आपल्या कार्यकाळात नव्हे, तर आधीच्या सरकारच्या कार्यकाळात तयार झाली होती, असा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.  

श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालावर आपण केवळ सही केली, असा खुलासा भुजबळ यांनी केल्याने बाळासाहेबांची अटक ही युती सरकारच्या काळात तयार करण्यात आलेल्या फाईलमुळे झाल्याचे अप्रत्यक्षपणे अधोरेखित होत आहे.

बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत झालेल्या दंगलीच्या तपासासाठी न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. या आयोगाच्या शिफारशीनुसारच आपण कारवाई केल्याचे यावेळी भुजबळांनी सांगितले. एका अग्रलेखाच्या प्रकरणावरुन २००० साली बाळासाहेबांना अटक केली होती.

गृहमंत्री झाल्यानंतर नेमकी बाळासाहेबांच्या अटकेचीच फाईल माझ्यासमोर आली. त्यावेळी पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे, असे सांगितल्याने त्या फाईलवर मी केवळ सही केली. ती फाईल माझ्या कार्यकाळात तयार करण्यात आली नव्हती, असे भुजबळ यांनी सांगितले.