बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भूखंड मिळत नाही, हे दुर्दैव; राज ठाकरेंचा राज्य सरकार, शिवसेनेवर निशाणा

0
478

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नावाचा वापर स्वार्थासाठी केला जात आहे. मात्र. त्यांच्या स्मारकासाठी सरकारला भूखंड मिळत नाही, हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर तोफ डागली.  महापौरांचा बंगला स्वार्थासाठी काढून घेतला जात आहे. मुंबईचा महापौर इकडेतिकडे फिरताना दिसत आहे. ही महापौर आणि या पदाची थट्टा आहे, असेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी मुंबईतील अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज (गुरूवारी)  दुपारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची महापालिकेत  भेट घेतली. यावेळी त्यांनी फेरीवाल्यांच्या प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकार आणि शिवसेनेवर  कोरडे ओढले.

शिवाजी पार्कातील जिमखान्याचे आरक्षण बदलून त्या ठिकाणी महापौर निवासस्थान उभारण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, तिथे महापौर बंगला बांधून देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  फेरीवाल्यांच्या प्रश्नावर राज यांनी आक्रमक भूमिका  घेतली. मनसेच्या आंदोलनानंतर रेल्वेच्या दीडशे मीटर परिसरात फेरीवाले बसणार नाहीत, असा निर्णय दिला आहे. मात्र, पालिकेतील अधिकारी पैसे घेऊन फेरीवाल्यांना या परिसरात पुन्हा बसवतात. त्यांना हटवले नाही, तर पुन्हा आंदोलन करू, असा इशाराही राज यांनी यावेळी   दिला.