Maharashtra

बाळासाहेबांच्या स्मारकाला दिवाळीनंतरचा मुहूर्त

By PCB Author

October 11, 2018

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकांची डिसेंबरनंतर धामधूम सुरू होणार असल्याने नोव्हेंबरमध्ये दिवाळीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकारच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असल्याचे समजते. मुंबईच्या महापौरांच्या निवासस्थानी हे स्मारक होत असल्याने राणीबागेतील नूतीनकरण करण्यात आलेल्या बंगल्यात महापौरांचा तात्पुरता निवास असणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर निवासस्थानाच्या जागेवर साकारण्याची घोषणा १७ नोव्हेंबर २०१५ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केली होती. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाची स्थापना करण्यात आली. न्यासाच्या अध्यक्षस्थानी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करून स्मारकासाठी महापौर निवासाच्या जागेची हस्तांतरण प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. महापौर निवासाच्या मूळ पुरातन बांधकामाला धक्का न लावता स्मारक उभारले जाणार असून, जमिनीच्या खालीही स्मारकाचे बांधकाम होणार आहे. त्यामुळे मधल्या काळात आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवण्यात आल्या होत्या.

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता डिसेंबरमध्ये कधीही लागू होणार असून, याच काळात सेना-भाजप यांच्यातील लोकसभेबाबतच्या युतीची, जागावाटपाची चर्चा सुरू होणार आहे. त्यामुळे या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम त्याआधीच म्हणजे नोव्हेंबरमध्ये दिवाळीतच होणार असल्याचे कळते. यासाठी धनत्रयोदशीचा दिवस की, १७ नोव्हेंबर हा बाळासाहेबांचा सहावा स्मृतिदिन निश्चित करायचा यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे कळते.