बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्ववादी; आरपार राष्ट्रभक्तीचे विचार संघाला पेलवले असते काय? – उद्धव ठाकरे

0
509

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमाला हजेरी लावण्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून संघ आणि भाजपाचे कान टोचले आहे. संघ स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे मानतो, पण त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कधीच का बोलावले नाही हा एक प्रश्नच आहे. बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्ववादी, आरपार राष्ट्रभक्तीचे विचार संघाला पेलवले असते काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर प्रणव मुखर्जी गुरुवारी गेले. त्यावरून बराच गदारोळ केला. काँग्रेसवाले मूर्ख म्हणून त्यांनी हा थयथयाट केला. प्रणव मुखर्जी हे नागपुरात जाऊन काहीतरी बॉम्बे टाकतील असे वाटले होते, पण लवंगी फटाक्याचाही आवाज आला नाही. मुखर्जी यांचे नागपुरात जाणे जेवढे वाजले तेवढे संघ मंचावरील भाषण गाजले नाही असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

प्रणवबाबूंनी देशात सुरू असलेल्या इतर गंभीर विषयांना स्पर्श करण्याचे टाळले. देशातील न्यायव्यवस्थेत जो असंतोष खदखदतो आहे त्यावर ते बोलले नाहीत. देशात महागाई आणि बेरोजगारीचा भडका उडाला आहे व सामान्य जनता त्यात मरत आहे. महागाई व बेरोजगारीचा वणवा विझवण्यात सरकारे कमजोर पडली आहेत. यावर एक अर्थतज्ञ म्हणून प्रणव मुखर्जी यांचे भाष्य अपेक्षित होते, पण मुखर्जी यांचे भाषण रेंगाळत राहिले. मुळात संघाने मुखर्जी यांना का बोलावले, त्यातून काय साध्य झाले, मुखर्जी यांनी नेमके काय मार्गदर्शन केले हे संघाचे प्रशिक्षण व बौद्धिक विभागाचे प्रमुखदेखील सांगू शकणार नाहीत असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.