बाळासाहेबांचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच- रामदास आठवले

0
427

पुणे, दि. १६ (पीसीबी) –  ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हुशारीने नक्कल करून राज ठाकरे यांनी भाषणात विकास साधला आहे, पण खरे वारसदार उद्धव ठाकरेच आहेत,’ असे मत रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी आज पुण्यात व्यक्त केले.

महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना विरोधकांवरही निशाणा साधला. ‘यंदाची निवडणूक आम्हाला २०१४ पेक्षाही सोपी आहे,’ असा दावा त्यांनी केला. वंचित व दलितांचे राजकारण करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांवरही त्यांनी नाव न घेता टीका केली. ‘वंचित बहुजन आघाडी काढून रिपब्लिकन पक्षाचे नाव पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, तसे होणार नाही. माझा पक्ष कायम राहणार, असे आठवले म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने भाजपकडे ८ जागांची मागणी केली होती, पण पाच जागा मिळाल्या. त्यामुळे केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळायला हवे. राज्यातही एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद हवे. विधान परिषदेत दोन आमदार आणि चार महामंडळांवर प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्र असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.