Maharashtra

बाळासाहेबांचीही सभा मोठी व्हायची, पण मतं मिळत नव्हती; आठवलेंचा आंबेडकर-ओवेसींवर निशाणा

By PCB Author

October 03, 2018

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचीही सभा मोठी व्हायची, पण त्यांना मते मिळत नव्हती. सभा मोठी झाली म्हणून सगळी मते मिळतील, असे नाही असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर – असदुद्दीन ओवेसी यांच्या बहुजन वंचित विकास आघाडीवर बोलताना दिली आहे.

भारिप-एमआयएमच्या आघाडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा फरक पडणार नाही, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. त्यांची युती आमच्याच फायद्याची असून भाजपा – आरपीय युतीला याचा फायदा होईल असेही ते म्हणाले आहेत.

‘प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी एकत्र आल्याने आमचाच फायदा होणार आहे. नरेंद्र मोदींबद्दल लोकांचे चांगले मत आहे, त्यांच्या युतीचा आम्हाला फायदा होईल. अकोल्याच्या बाहेर प्रकाश आंबेडकर यांना फायदा होणार नाही. दलित मतांमधील महत्वाची मते आमच्यासोबत असणार आहेत’, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

सभेला झालेल्या गर्दीवर बोलताना, ‘कार्यकर्ते आणि जनता आमच्यासोबत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याही सभेला खूप गर्दी व्हायची, पण त्यांना मते मिळत नव्हती’, असे सांगितले. मुस्लिम मतांवर बोलताना सगळी मते आंबेडकर-ओवेसी यांना मिळतील असे काही नाही. आम्हाला पण मते मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.