Banner News

बालेवाडी क्रीडा संकुलातील मतदान यंत्रांना सुरक्षा कवच

By PCB Author

October 22, 2019

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२१) मतदान झाले. तिन्ही मतदारसंघात मतदान झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे सीलबंद करून बालेवाडीतील क्रीडा संकुलात कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. गुरूवारी (दि.२४) मतमोजणी होणार आहे.

मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी सीसीटीव्हीचा २४ तास वॉच असेल.  मतदान यंत्रे ठेवलेल्या    २४ तास कडक पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.  बालेवाडी संकुलातील मैदानाला स्ट्राँगरूमचे स्वरूप देण्यात आले आहे. दरवाजे पूणेपणे सील करण्यात आली आहेत. स्ट्राँगरूमना त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुख्य गोदामाला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा देण्यात आली आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रीक वायरिंग नाही. तसेच आतमध्ये वीजसुध्दा बंद ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातील १८, चिंचवडमधील ११ व भोसरीतील १२ अशा एकुण ४१ उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतदान यंत्रात बंद झाले. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली असून गुरुवारी (दि. २४) निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पिंपरी विधानसभेत ५१.५०, चिंचवडमध्ये ५३.३२ तर भोसरी विधानसभेत ५९.२० टक्के मतदान झाले.