बालेवाडी क्रीडा संकुलातील मतमोजणीच्या ठिकाणाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

0
722

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शिरुरचे निवडणूक निर्णय अधिकारी  रमेश काळे व मावळच्या  निवडणूक निर्णय अधिकारी कविता व्दिवेदी यांनी मतमोजणीच्या ठिकाणाची आज (सोमवार) पाहणी केली. यावेळी  उपजिल्हाधिकारी संदिप निश्चित, भारत संचार निगम लिमिटेडचे  परदेशी, राखेलकर, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे उप कार्यकारी अभियंता शुल्‍क, वाघमारे, पोलिस निरीक्षक यशवंत गवारी आदी उपस्थित होते.

शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिलरोजी मतदान झाले. बालेवाडीतील क्रीडा संकुलातील स्ट्राँगरूममध्ये मतदान यंत्रे कडक बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत.  या दोन्ही मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मेरोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी करून आवश्यक त्या सुचना दिल्या.

शिरूर आणि मवाळ  लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी बालेवाडी येथे होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.  सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. केंद्रीय राखीव पोलिस, राज्य राखीव पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस असे तीन टप्पे आहेत. सर्वप्रथम महाराष्ट्र पोलिस ओळखपत्राची तपासणी करतात. त्या पुढे राज्य राखीव पोलिसांकडून यंत्रांच्या माध्यमातून तपासणी केली जाते. केंद्रीय राखीव पोलिस दलातर्फे मोबाइल व इतर वस्तूंची तपासणी केली जाते. याशिवाय चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मतमोजणी कक्षात कोणालाही मोबाइल आतमध्ये नेण्यास परवानगी नाही. निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान अधिकारी कोणीही मोबाइल आतमध्ये नेऊ शकत नाही.

प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी, रनर, कोतवाल असे सुमारे एक हजार कर्मचारी मतमोजणीसाठी असणार आहेत. मतमोजणी कर्मचाऱयांना १६ आणि २२ मे रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे. पोस्टल मतदानासाठी ८ टेबल अशा एकूण ९२ टेबलांवर मतमोजणी होणार आहे.  मतमोजणीच्या एका टेबलवर ४ अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक आणि एक शिपाई असे ४ कर्मचारी एका टेबलवर असतील.