बालहट्ट आणि आजोबांची माघार !

0
465

– शिवराय कुळकर्णी

कॉंग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुत्राने म्हणजे डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुजयचा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी आपली नसल्याची प्रतिक्रिया दिली. नियतीने पवारांवर काय वेळ आणली! सुजयचा बालहट्ट पूर्ण न करताना पार्थच्या बालहट्टासाठी स्वतः पवारांना माढातून माघार घ्यावी लागली. तर पुन्हा लढण्याची वेळ आलीच तर रोहितच्या बालहट्टाची व्यवस्था देखील त्यांनीच करून घेतली असेल, हे सुज्ञांना सांगण्याची आवश्यकता नाही.

राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका बजावण्यासाठी निघालेले आजोबा तूर्तास बालहट्टात गुरफटले आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर माघारपर्वाची नाचक्की ओढवली. सेनापतीची माघार राज्यातील कानाकोपऱ्यात महाग पडेल असा बोध होताच पुन्हा तिसऱ्या बालहट्टाची योजना पवार घराण्याला किंवा राष्ट्रवादीला करावी लागली. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बालहट्टासमोर राधाकृष्ण विखे पाटील पिता म्हणून हतबल झाले असल्याचे चित्र एव्हाना समोर आलेले नाही. किंबहुना सुजय यांच्या निर्णयाकडे राजकीय मात म्हणून पाहिले जात आहे. या निर्णयाच्या वेळी विखे घराण्याची हतबलता किंवा अगतिकता प्रसिद्धी माध्यमांसमोर आली नाही. जुन्या वैमनस्याची वाच्यता न करता अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे घोडे दामटवून विखेंची वाट रोखण्याचा पवारांचा प्रयत्न होता. हे राजकीय वर्तुळाला सांगण्याची गरज नाही. पार्थ अजित पवार यांच्यासाठी लावण्यात आलेले निकष डॉ. सुजय यांना लावून अहमदनगर सोडता आले असते. या खुनशी राजकारणाला बळी न पडता सुजय यांनी भाजपाशी जवळीक करणे हा शहच नाही तर पवारांवर केलेली मात आहे. काँग्रेसची अंतर्गत गटबाजी देखील तेवढीच त्यासाठी कारणीभूत आहे. यात राजकारणातील विखे घराण्याने काय मिळवले आणि काय गमावले हे आगामी काळात स्पष्ट होईल. पण वर्तमानाचा व संधीचा विचार करता विखेंनी मातच केली.

सुजय विखे यांच्या उमेदवारीला बालहट्ट म्हणत असताना पवारांनी पार्थ यांना कसे नजरेआड केले, हा मोठा प्रश्न आहे. पार्थ पवार हे मावळचे स्वाभाविक दावेदार नाहीत. अजित पवारांच्या आग्रहातून पार्थची उमेदवारी समोर आली. रोहित पवार की पार्थ पवार या घरातील संघर्षातून पार्थ उमेदवार झाले. पवारांनी राजकारणात नेहमी दिवसाच्या उजेडात एक दिशा तर रात्रीच्या अंधारात दुसरी दिशा दाखवली आहे. बोलतील एक आणि करतील दुसरे. तोडफोडीच्या आणि तडजोडीच्या राजकारणात त्यांचा हात कोणी धरत नाही. पण आता त्यांच्या राजकारणाची धग त्यांच्याच घरापर्यंत पोहचल्याचे दोघांचे बालहट्ट पाहता निदर्शनास येते.

आजोबा माघार घेताना खरं तर पार्थ पवार यांनीच समोर होऊन मी थांबतो तुम्ही लढा, किमान एवढे म्हटले असते तरी ते बरे दिसले असते. किमान पवारांची हतबलता काही अंशी लपली असती. पार्थ आणि अजितदादा यांनी मौन बाळगल्यावर आजोबा तुम्ही लढाच, असे म्हणण्यासाठी अखेर रोहित यांना समोर आणावे लागले. पवार समर्थकांना हे प्रकरण भावनिक वाटत असले तरी मुळात ते कुटुंबातील कलहातून उदभवलेले आहे. एरवी कणखर वाटणाऱ्या पवारांची अगतिकता माढातील माघारपर्वाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बघायला मिळाली आहे.

पवारांना कुठले वारे वाहताहेत, त्याचा रोख कळतो, अशा आशयाचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांच्या गौरवार्थ केले होते. खरोखर पवारांना हवेचा रोख कळतो. देशाप्रमाणेच माढातील वारे बदलल्याचा रोख त्यांना कळला. आणि आजोबांच्या मदतीला बालहट्ट धावून आला. त्यांच्या सोयीनुसार बालहट्टाचा सहारा घेतला. न लढल्यास पार्थची उमेदवारी आणि पुन्हा लढायचा निर्णय घ्यावा लागला तर रोहितचे भावनिक आव्हान अशी सोय त्यांनी करून ठेवली आहे. आजोबांची माघार हा राष्ट्रवादी काँग्रेसला अपशकुन ठरेल की काय या चिंतेने सध्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसजनांना ग्रासले असल्याचे दिसते आहे.