Pimpri

बालवाडी शिक्षिकांना भरघोस वेतनवाढ मंजूर; केशव घोळवे यांच्या प्रयत्नाने बालवाडी शिक्षिकांना भरघोस वेतनवाढीची रक्षाबंधन भेट

By PCB Author

August 23, 2021

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करणार्‍या 210 बालवाडी शिक्षिकांना भरघोस वेतनवाढीचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. गेली वर्षभर माजी उपमहापौर व राज्यातील कामगार नेते केशव घोळवे यासाठी प्रयत्नशिल होते. अखेर रक्षाबंधनच्या पार्श्वभुमीवर या बालवाडी सेविकांना रक्षाबंधनची भेट मिळाली आहे.

शुक्रवार दि. 20 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या विषयाची उपसुचना मंजूर करण्यात आली आहे. पाच वर्षे नोकरी झालेल्या बालवाडी सेविकांना महापालिका सात हजार रुपये मानधन देत होती त्यांना तीन हजारांची वाढ करुन हे मानधन दहा हजार रुपये इतके करण्यात आले आहे. आइ सेविकांना याचा लाभ होणार आहे. पांच ते दहा वर्षे सेवा झालेल्या आठ सेविकांना आठ हजार रुपये मानधन दिले जात होते त्यांना आता चार हजार रुपयांची वाढ करुन बारा हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. दहा ते पंधरा वर्षे सेवा झालेल्या चौर्‍याऐंशी सेविकांना पाच हजाराची वाढ करुन त्यांचे मानधन नऊ हजारावरुन चौदा हजार इतके करण्यात आले आहे. पंधरा ते वीस वर्षे सेवा झालेल्या पस्तीस सेविकांना आठ हजार रुपयांची वाढ सुचविण्यात आली असून त्यांचे मानधन दहा हजार वरुन अठरा हजार करण्यात आले आहे. तर वीस ते पंचवीस वर्षे सेवा झालेल्या पंचाहत्तर सेविकांना नऊ हजार रुपयांची वाढ सुचविण्यात आली असून या सेविकांचे मानधन अकरा हजार वरुन वीस हजार इतके करण्यात येणार आहे.

याच बरोबर पंचवीस ते ती वर्षे सेवा करणार्‍या सेविकांना पंचवीस हजार रुपये तर तीस वर्षांपुढे सेवा झाल्यास त्या सेविकांना तीस हजार रुपये इतके मानधन देण्याची तरतूद या प्रस्तावात करण्यात आली आहे.

माजी उपमहापौर केशव घोळवे हे गेली वर्षेभर यासाठी प्रयत्नशिल असून आज त्यांच्या प्रयत्नांना मूर्त स्वरुप प्राप्त झाल्याने या बालवाडी सेविकांना रक्षाबंधनच्या पार्श्वभुमीवर भरघोस वेतनवाढीची भेट प्राप्त झाली आहे. महापालिकेतील दोनशे दहा सेविकांना याचा लाभ मिळणार असून महापालिका अस्थापनेवर दरवर्षी एक कोटी सत्याहत्तर लाख बारा हजार रुपयांचा बोजा पडणार आहे.