बाराशे स्थलांतरीत पंढरपुरातून लखनौला रवाना

0
294

पंढरपूर, दि. २१ (पीसीबी) – उत्तर भारतीय नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मुंबई, पुणे पाठोपाठ आता पंढरपुरातूनही रेल्वे रवाना झाली. टाळेबंदीमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या उत्तरप्रदेश येथील १ हजार १५९ स्थलांतरितांना पंढरपूर रेल्वे स्थानकातून विशेष श्रमिक रेल्वेने बुधवारी लखनौकडे रवाना करण्यात आले. लखनौला ही रेल्वे आज (गुरुवार) सायंकाळी पोहचणार आहे.

पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन बुधवारी सायंकाळी ५ वाजता लखनौकडे १हजार १५९ स्थलांतरितांना रवाना करण्यात आले.स्वगृही परतणाऱ्या नागरिकांना येऊ देण्यासाठी उत्तरप्रदेश शासनाकडून मंजूरी मिळाली. त्यानंतर जिल्हाप्रशासनाने यादी तयार करुन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उत्तरप्रदेशकडे जाण्याऱ्या विशेष रेल्वेचे नियोजन केले. त्यानुसार उत्तरप्रदेश येथील लखनौकडे या स्थलांतरित नागरिकांना विशेष श्रमिक रेल्वेने रवाना करण्यात आले.

यावेळी सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी व थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. प्रशासनाकडून रेल्वेमध्येच पाणी व जेवणाची सोय करण्यात आली होती. रेल्वे डब्यात योग्य अंतर ठेवून त्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. तत्पुर्वी पंढरपूर रेल्वे स्थानकात संपूर्ण रेल्वेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. ही रेल्वे लखनौ येथे आज सायंकाळी ८.१५ पर्यंत पोहचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर ५१५, मंगळवेढा ८०,करमाळा ९१, सांगोला ९५ आणि माळशिरस ३७८ या तालुक्यातील एकूण ११५९ नागरीकांना पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन स्वगृही रवाना करण्यात आले. यावेळी प्रवाशांनी प्रशासनाने केलेल्या सोयी-सुविधा आणि स्वगृही जाण्याचा आनंद व्यक्त करुन प्रशासनाचे आभार मानले.