बारावीच्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेचे फोटो काढणाऱ्या अल्पवयीन तरुणावर गुन्हा

0
452

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एका अल्पवयीन विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढल्याची घटना समोर आली आहे. तो हे फोटो कोणाला तरी पाठवून उत्तर मिळवणार होता असे बोलले जात आहे. ही घटना सांताक्रूझमधील कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.

या तरुणावर विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मात्र तो अल्पवयीन असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझमधील कनिष्ठ महाविद्यालय बारावीचे परीक्षा केंद्र असून वाकोला येथील रात्र महाविद्यालयातील विद्यार्थी या परीक्षा केंद्रात आला होता. गुरुवारी पहिलाच पेपर इंग्रजीचा होता. सकाळी ११ वाजता परीक्षा सुरु झाली. साडे अकराच्या सुमारास पर्यवेक्षकाला एक विद्यार्थी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचे मोबाईलवर फोटो काढत असल्याचे लक्षात आले आणि हा प्रकार उघड झाला.  हे फोटो तो कोणाला पाठवणार होता, हे अजूनही समजू शकलेले नाही. विद्यार्थ्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. त्याचा हेतू काय होता, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. बारावीची परीक्षा सुरु आहे आणि आरोपी हा अल्पवयीन असल्याने तुर्तास त्याला अटक करण्यात आलेली नाही. विद्यार्थी परीक्षा केंद्रात मोबाईल घेऊन कसा काय पोहोचला, याचा देखील तपास केला जाणार आहे.