बारावीच्या परिक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थीनीकडे प्राध्यापकांनी केली शरीरसुखाची मागणी

0
863

नाशिक, दि. १९ (पीसीबी) – बारावीच्या परिक्षेत नापास  झालेल्या एका विद्यार्थीनीला पास करण्यासाठी दोन प्राध्यापकांनी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नाशिकमधील पंचवटीतील महाविद्यालयामध्ये घडली.

याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर आडगाव पोलिसांनी  प्राध्यापक प्रवीण दादाजी सूर्यवंशी आणि सचिन निशिकांत सोनवणे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्राध्यापक प्रवीण आणि सचिन यांनी संबंधित विद्यार्थिनीस १२ वी मध्ये नापास झालेल्या विषयात पास व्हायचे असल्यास तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी केली. तसेच प्रात्येक्षक सुरू असताना विद्यार्थीनीचा विनयभंग केला. १ जानेवारी २०१५ पासून ते १८ सप्टेंबर २०१८ असा सुमारे तीन वर्षांपासून दोन्ही प्राध्यापकांकडून सुरू असलेल्या त्रासास कंटाळलेल्या पिडीत विद्यार्थिनीने पालकांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी मंगळवारी (दि.१८) आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत प्राध्यापकांविरोधात तक्रार दाखल केली. मात्र महाविद्यालयातील प्राचार्याने हा आरोप फेटाळून लावला आहे.