बारामती जिंकून दाखवू; गिरीश महाजनांनी अजित पवारांचे आव्हान स्वीकारले

0
812

मुंबई, दि. २० (पीसीबी) – बारामती जिंकण्याच्या विधानावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेला आहे. जेव्हा बारामतीची निवडणूक लागेल तेव्हा निश्चित  तेथील नेतृत्त्व मी घेईन आणि बारामती नगरपालिका ताब्यात घेईन, असे प्रतिआव्हान  गिरीश महाजन यांनी अजित पवारांना दिले आहे.

गिरीश महाजन यांनी  बारामती जिंकण्याचे विधान केले होते. या विधानाचा  अजित पवारांनी  खरपूस समाचार घेताना बारामती काय आहे ते ठाऊक नाही आणि निघाले बारामती जिंकायला, अशी टीका केली होती. एकदा बारामतीत या मग बघतोच असे आव्हान अजित पवार यांनी दिले होते. त्यावर आज (रविवार) गिरीश महाजन यांनी  प्रत्युत्तर देताना आपण बारामती जिंकून दाखवू, असे म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दरम्यान, अजित पवार यांनी हे आव्हान दिल्यावर गिरीश महाजन म्हटले की, पक्षाने मला आदेश दिला तर बारामतीत जाऊन नगरपालिका हमखास ताब्यात घेईन. १०० टक्के असे त्यांच्याकडे काहीही नाही. त्यामुळे बारामती जिंकणे अवघड नाही, असे म्हणत महाजन यांनी अजित पवारांचे आव्हान स्वीकारले आहे.