बारामतीत शरद पवारांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या  

0
1167

पुणे, दि. ९ (पीसीबी) –  क्रांती दिनी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (गुरूवारी)  ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांनी बंद पुकारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानाबाहेरही आंदोलकांनी  ठिय्या आंदोलन केले आहे.  यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ठिय्या आंदोलनात सहभाग घेऊन घोषणाबाजी केली.  

मराठा आंदोलक आज सकाळी ९ वाजताच गोविंदबागबाहेर  दाखल झाले. यावेळी  त्यांनी घोषणाबाजी  केली. आंदोलकांच्या ठिय्यामुळे पवारांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला  होता. काही वेळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार घराबाहेर आले आणि ते देखील आंदोलकांसोबत घोषणाबाजी देऊ लागले. पवार कुटुंबीयांपैकी सध्या अजित पवारच गोविंदबागमध्ये आहेत.

दरम्यान, याआधी ८ वर्षांपूर्वी ऊस आंदोलनादरम्यान आंदोलकांनी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली होती. त्यानंतर आज पवारांच्या घराबाहेर ठिय्या देण्यात आला आहे.