बारामती मतदारसंघात पवार घराण्याने भाजपला दाखवला पुन्हा दम; सुप्रिया सुळे १ लाख ५५ हजार ७७४ मतांनी विजयी

0
687

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा शंभर टक्के पराभव होणार अशा वल्गना करणाऱ्या भाजपला पवार घराण्याने धडा शिकवला. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा तिसऱ्यांदा विजय झाला. सुप्रिया सुळे यांना ६ लाख ८६ हजार ७१४ मते, तर भाजपच्या कांचन कुल यांना ५ लाख ३० हजार ९४० मते मिळाली. त्यामुळे सुळे या १ लाख ५५ हजार ७७४ मतांनी विजयी झाल्या. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नवनाथ पडळकर यांना ४४ हजार १३४ मते पडली. तसेच ७ हजार ८६८मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले होते. बारामती, इंदापूर, दौंड, भोर, पुरंदर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात एकूण २१ लाख १२ हजार २०८ मतदार होते. त्यातील १२ लाख ९९ हजार ७९२ मतदारांनी मतदान केले होते. गुरूवारी सकाळी आठ वाजता पुण्यात मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणीच्या सुरूवातीपासून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी मतांची आघाडी घेतली होती. ती विजयापर्यंत कायम राहिली.

२१ लाख १२ हजार २०८ मतदानांपैकी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना ६ लाख ८६ हजार ७१४ मते पडली. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना ५ लाख ३० हजार ९४० मते पडली. या राजकीय लढाईत सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५५ हजार ७७४ मते घेत घवघवीत यश मिळवले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नवनाथ पडळकर यांना ४४ हजार १३४ मते पडली. त्याचप्रमाणे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अॅड. मंगेश वनशीव यांना ६ हजार ८८२ मते पडली. ७ हजार ८६८ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे.