बारामतीत घरात घुसून विवाहित तरुणाने अल्पवयीन तरुणीला लग्नासाठी घातले मागणे; तरुणीने केली आत्महत्या

0
558

बारामती, दि. १२ (पीसीबी) – विवाहित तरुणाने घरात घुसून एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला लग्नासाठी मागणी घातल्याने तरुणीच्या घरच्यांनी तरुणाच्या घरच्यांना जाब विचारला मात्र तरुणाच्या घरच्यांनी तरुणीच्या घरच्यांना मारहाण करुन गाव सोडून जाण्याची धमकी दिल्याने हताश झालेल्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये नागतळे भागात घडली.  

याप्रकरणी मयत तरुणीच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर भीमराव गोंडे, सोन्या ज्ञानेश्वर गोंडे, गणेश ज्ञानेश्वर गोंडे आणि दादा ज्ञानेश्वर गोंडे यांच्याविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार ‘आरोपी सोन्या गोंडे अचानक आमच्या घरी आला. मुलीला लग्नाची मागणी घालत तिची छेडछाड करु लागला. घडलेल्या प्रकाराबाबत संबंधित मुलाच्या घरच्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनीच आम्हाला मारहाण करुन गाव सोडून निघून जाण्याची धमकी दिली. त्यामुळे आलेल्या नैराश्य आणि भीतीपोटी मुलीने राहत्या घरात गळफास घेतला’, अशी तक्रार मयत तरुणीच्या आईने दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार आरोपींवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बारामती तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत.