बारामतीतून मीच लढणार आणि जिंकणार – महादेव जानकर

0
761

बारामती, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादी व काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी लोकसभेच्या सहा व विधानसभेच्या पन्नास जागा लढवणार आहे. जागा वाटपावेळी भाजपशी तडजोडही केली जाईल. तसेच बारामतीतून मीच निवडणूक लढवणार आहे, आणि मीच जिंकणार आहे,  असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.  

जानकर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, बारामती, माढ्यासह सहा जागा आम्ही भाजपकडे मागणार आहोत. २०१४ मध्ये मला माढा मतदारसंघातून लोकसभा लढवायची होती. मात्र, राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी षड्‌यंत्र रचून तो मतदारसंघ घेतला. दरम्यान,  मी पक्षाचा अध्यक्ष असल्याने मी कोठूनही निवडणूक लढवू शकतो. पण बारामतीतूनच लढण्याला माझी पहिली पसंती असेल, असे ते म्हणाले.

दरम्यान, २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत जानकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली होती. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. मात्र, त्यांच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळेच आता जानकर यांनी पुन्हा बारामतीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.