बारामतीच्या नेत्याचा मी बंदोबस्त करतो त्याची तुम्ही काळजी करू नका – देवेंद्र फडणवीस

0
455

मुंबई,दि.१८ (पीसीबी) – हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आल्यामुळे आता त्यांना कोणाचा सासुरवास राहिला नाही. बारामतीच्या नेत्याचा मी बंदोबस्त करतो, त्याची तुम्ही काळजी करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर येथे पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला. इंदापूरमधील अनेक जण भाजपमध्ये प्रवेशास इच्छुक होते, पण हर्षवर्धन पाटील आमचा तुमच्यावरच डोळा होता, असेही ते म्हणाले.

विकासकामांबाबत मुख्यमंत्री म्हणाले, की आम्ही अधिकाधिक निधी सिंचनावर खर्च केला. इंदापूर तालुक्यात मागील पाच वर्षांत झालेली कामे केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पावसाळ्यात नेहमी एकीकडे पूरस्थिती, तर दुसरीकडे मोठा भाग कोरडा राहतो. यातून मार्ग काढण्यासाठी पुराचे पाणी सुकलेल्या भागात आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने कृष्णा- भीमा स्थिरीकरण योजना व्यापक केली जाईल.

नीरा भीमा योजनेचा त्यात सहभाग करून इंदापूरच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढला जाईल. हर्षवर्धन पाटील यांना निवडून द्या आणि इंदापूरचा विकास माझ्याकडून घ्या.

हर्षवर्धन पाटल म्हणाले, की पाच वर्षांत इंदापूरचा विकास झाला नाही. केवळ जातीय राजकारणाला खतपाणी घातले गेले. रोजगार नाही, शेतीला पाणी नाही. त्यामुळे यापुढे इंदापूर तालुका भाजपचा झाला आहे.