बायकोच्या प्रियकराने केला पतीवर जीवघेणा हल्ला, पण मोबाईलने वाचवला जीव!

0
268

सांगवी, दि. १८ (पीसीबी) – पत्नीच्या प्रियकराने पतीवर हल्ला केल्याची घटना 9 जानेवारी रोजी जुनी सांगवी येथे घडली. आनंद सोळंकी यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी जसप्रितसिंग अमरजितसिंग सत्याल (वय 30) आणि सुनील हिवाळे या दोघांना औरंगाबाद येथून तर आनंद इंगळे (वय 27) याला उल्हासनगरमधून अटक केली आहे. आणखी तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

9 जानेवारी रोजी फिर्यादीच्या आईने फिर्यादी आनंद सोळंकी आणि त्यांच्या पत्नीला शतपावली करण्यास जायला सांगितले, म्हणून् ते चालायला गेले असता आरोपी आनंद इंगळे याने महिलेच्या पतीवर गोळी झाडली. पण सोळंकी हे फोनवर बोलत असल्याने ती गोळी फोनवर आदळली आणि तिचा मार्ग चुकला. त्यामुळे गोळी मानेला लागली. त्यात सोळंकी गंभीर जखमी झाले. मोबाईलमुळे त्यांचा जीव जाण्यापासून वाचला.

आरोपी जसप्रितसिंगचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा आहे. फिर्यादींच्या पत्नीचे व जसप्रितसिंगचे लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. परंतु ते एका समाजाचे नसल्याने त्यांचे लग्न झाले नाही. म्हणून या महिलेने फिर्यादींबरोबर चार वर्षांपूर्वीच लग्न केले. पण त्यांचा घटस्पोट झाला व पुन्हा सामंजस्याने लग्न झाले.

लग्न झाले असूनही महिलेचा भाऊ त्याच्या फोनवरून जसप्रितसिंगला फोन करायचा व महिलेस कॉन्फरन्सवर घेऊन त्यांचे बोलणे घडवायचा. जसप्रितसिंगच्या सांगण्यावरून सुनिल हिवाळे व आनंद इंगळे यांनी आनंद सोळंकी यांना ठार मारायचा कट रचला. सोळंकी यांना मारण्यासाठी जसप्रितसिंग याने अन्य आरोपींना तब्बल पाच लाखांची सुपारी दिली. त्यातील काही रक्कम जसप्रितसिंग याने आरोपींना दिली. त्यातून आनंद इंगळे याने मध्य प्रदेश येथून पिस्टल आणले.

सुनिल हिवाळे हा फार्मसीचे काम करायचा व पैसे मिळवण्याचे साधन म्हणून हा मार्ग स्वीकारला. आनंद इंगळे हा विजया होंडाच्या शोरूममध्ये काम करत असून तो रेकीचेही काम करायचा. तो उल्हासनगरहून पुण्याला दुचाकीने यायचा. मागील बरेच दिवस आरोपींचा रेकीचे काम चालले होते. नऊ जानेवारी रोजी त्यांनी डाव साधत सोळंकी यांच्यावर खुनी हल्ला केला. दैव बलवत्तर म्हणून गोळी फोनला लागली आणि गोळीची दिशा चुकली. मात्र, सोळंकी यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ दोन) आनंद भोईटे, पोलीस आयुक्त (वाकड विभाग) गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे, पोलीस नाईक कैलास केंगले, सुरेश भोजणे, रोहिदास बो-हाडे, अरुण नरळे, प्रविण पाटील, नितीन खोपकर, शशीकांत देवकांत, पोलीस शिपाई विजय मोरे, अनिल देवकर, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, शिमोन चांदेकर, नुतन कोंडे यांनी केली आहे.