Desh

बाबा राम रहीमची पॅरोल याचिका हायकोर्टांनी फेटाळली

By PCB Author

August 27, 2019

पंजाब, दि. २७ (पीसीबी) – महिलांवरील बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम सिंग यांच्या पॅरोल याचिका आज (मंगळवार) पंजाब आणि हरयाणाच्या हायकोर्टांनी फेटाळून लावल्या. राम रहीमची पत्नी हरजीत कौरने ऑगस्ट महिन्यांत या याचिका दाखल केल्या होत्या.

राम रहीमची आई नसीब कौर यांच्या वैद्यकीय उपचारांचे कारण देत ही याचिका दाखल करण्यात आली होती. राम रहीमच्या बाजूने कोर्टात माहिती देताना हरजीत कौरने कोर्टाला सांगितले की, “राम रहीमच्या आईला वैद्यकीय उपचार घ्यायचे असून हे उपचार आपल्या मुलाच्या देखरेखीखाली व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे, त्यामुळे तो पॅरोलसाठी पात्र आहे.” मात्र, पॅरोल नाकारताना हायकोर्टाने म्हटले की, नसीब कौर यांच्यावर डॉक्टर उपचार करणार आहेत राम रहीम नाही. कोर्टाने निर्णय देताना पुढे म्हटले की, राम रहीमच्या मालकीचे मोठे हॉस्पिटल आहे. त्यामुळे त्याची आई नसीब कौर या आपल्या घरच्या हॉस्पिटलमध्ये कुटुंबियांच्या आणि हॉस्पिटल स्टाफच्या देखरेखीखाली उपचार घेऊ शकतात. यावेळी कोर्टाने हरजीत कौर यांच्या याचिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले.