“बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रध्दांजली असेल!”: पू. संभाजीराव भिडे गुरूजी

0
283
पिंपरी, दि.१७ (पीसीबी) : हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यलक्ष्मीचा संसार भगव्या झेंड्याबरोबर चालला पाहिजे, अशी सत्ता, समाज आणि राष्ट्र उभे केले पाहिजे, हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. हा संदेश उगवत्या पिढीच्या प्रत्येक तरूणाचे हृदय, बुध्दी आणि अंत:करणापर्यंत नेण्याचे कार्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची इतिहासाला दखल घ्यावीच लागेल आणि त्यांचा मार्ग पत्करून त्यांचे कार्य पुढे न्यावे लागेल, हीच त्यांना खरी श्रध्दांजली असेल, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरूजी यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘वारसा शिवशाहीराचा, जागर हिंदुत्वाचा’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते. 
 
पू. भिडे गुरूजी पुढे म्हणाले, ‘बाबासाहेब हिंदुस्तान आणि हिंदु समाजासाठी जगले. ज्या ज्या कोणाला आपला देश, संस्कृती, परंपरा परकीयांच्या दाढेतून मुक्त करून स्वाभिमानपूर्वक राष्ट्र म्हणून उभे रहावे असे वाटत असेल, त्यांना उपयोगी पडणारा बाबासाहेबांनी लिहलेला शिवचरित्राचा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे पारायण करून आपण कृती करावी’.
 
इतिहासप्रेमी मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष श्री. मोहन शेटे शिवशाहीरांच्या आठवणींना उजाळा देत म्हणाले, ‘बाबासाहेबांच्या निधनाने आपली कधीही न भरून निघणारी हानी झालेली आहे. बाबासाहेब हे मुळात संशोधक होते. विविध गड-किल्ल्यांवर जाऊन, भ्रमंती करून अनेक ऐतिहासिक कागदपत्रे गोळा केली, संदर्भ तपासले. या सर्व अभ्यासातून, संशोधनातून ‘राजा शिवछत्रपती’ हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. इतिहास सामान्यांपर्यंत पोचवण्याची तळमळ हे बाबासाहेब पुरंदरे यांचे वेगळेपण आहे. बाबासाहेब हे स्वातंत्र्यसैनिकही होते.’
 
वीररत्न बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. कौस्तुभ देशपांडे म्हणाले, ‘बाबासाहेबांच्या निधनाने आपला चालता-बोलता इतिहास गेला आहे, हे मान्य करायला लागेल. आपल्या देशाचे आणि हिंदुत्वाचे नुकसान झाले आहे. बाबासाहेबांना जर इतिहास लिहिला आणि जपला नसता तर आजची दिशा फार वेगळी असती आणि वेगळ्या दिशेने आपल्या पिढ्यांना नेले असते ! बाबासाहेबांसारखी एक यंत्रणा आहे ज्यांना इतिहासाचे पुनरूज्जीवन करायचे आहे; मात्र एक शासकीय यंत्रणा अशी आहे की, त्यांना हे करू द्यायचे नाही.’
 
सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘स्वातंत्र्यापूर्वीची १० वर्ष आणि स्वातंत्र्यानंतरची १० वर्ष हा काळ ताठ मानेने जगणार्‍या शिवछत्रपतींच्या तिरस्काराने भरलेला होता. तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ‘वाट चुकलेले देशभक्त’ आणि ‘लुटारू’ असे म्हटले होते. तशी नोंद त्यांच्या ‘डिस्कवरी ऑफ इंडीया’ या ग्रंथात आहे. त्या काळात इतिहासाच्या सत्याचा भंग झाला होता. १९५८-५९ च्या काळात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत इतिहास पुराव्यासहीत असलेले ‘शिवचरित्र’ प्रसिध्द केले. छत्रपती शिवाजी महाराज ‘वाट चुकलेले’ देशभक्त नव्हे; तर ते ‘वाट दाखविणारे महापुरुष’ आहेत, हे त्यांनी सिध्द केले. बाबासाहेब यांचे कर्तृत्व वादातीत आहे. सनातन संस्थेशी त्यांचे आत्मीय संबंध होते.’