बाबरी प्रकरणी ९ महिन्यांत निकाल द्या – सुप्रीम कोर्ट

0
360

नवी दिल्ली, दि, १९ (पीसीबी) – बाबरी खटल्याची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायाधीशांनी पुढील नऊ महिन्यांत निकाल द्यावा, असे निर्देश आज सुप्रीम कोर्टाने दिले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांविरोधात हा खटला सुरू आहे.

बाबरी खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस. के. यादव यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. नऊ महिन्यांच्या आत या खटल्याचा निकाल देण्यात यावा, असे आदेश यादव यांना कोर्टाने दिले. यादव हे ३० सप्टेंबरला निवृत्त होणार होते. खटल्याचे कामकाज संपवण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे यादव यांनी गेल्या सुनावणीदरम्यान कोर्टात सांगितले होते. त्यावर निकाल देईपर्यंत विशेष न्यायाधीशांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत काय करता येईल, याचे उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने विशेष न्यायाधीशांचा कार्यकाळ वाढवला. तसेच या खटल्याचा नऊ महिन्यांत निकाल द्यावा, असे आदेश त्यांना दिले.