बापरे! विनातिकीट प्रवास करणं आलं अंगाशी. गेल्या आठ दिवसांत तब्बल ‘एवढ्या’ प्रवाशांवर झाली कारवाई

0
270

मुंबई, दि.१० (पीसीबी) : कोरोना पार्श्वभूमीवरती रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. उपनगरीय रेल्वेसेवा सर्वासाठी खुली नसल्याने अनेक जण विनातिकीट प्रवासाचा प्रयत्न करत आहेत. १ जानेवारी ते ८ जानेवारी कालावधीत मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांविरोधात केलेल्या कारवाईत १४ हजार प्रवाशांची धरपकड केली. याशिवाय शुक्रवारी अत्यावश्यक सेवा कर्मचारी असल्याची बनावट ओळखपत्रे बाळगलेल्या ५४ जणांना पकडण्यात आले. त्यांची ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सध्या मध्य रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वाराजवळील सुरक्षा काढल्यानंतर अनेक जण बिनदिक्कत प्रवेश मिळवत असल्याचे सांगण्यात आले.

शुक्रवारी मध्य रेल्वेच्या विविध स्थानकात ५४ प्रवाशांकडून बनावट ओळखपत्र पकडण्यात आले. सरकारी, पालिका, खासगी रुग्णालय, विविध औषध कंपन्या आणि विमा कंपन्यांचे कर्मचारी म्हणून त्यांनी ओळखपत्र बनविले होते. आतापर्यंत मध्य रेल्वेवर ५०० हून अधिक बनावट ओळखपत्रधारकांना पकडण्यात आले आहेत. यामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबरच,मुंबई पालिका कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी व अन्य श्रेणीतील ओळखपत्रांचा समावेश आहे.

जून महिन्यापासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली. त्यानंतर विविध श्रेणींना प्रवासाची परवानगी दिल्यानंतर प्रवाशी संख्या वाढू लागली. सध्याच्या घडीला मध्य रेल्वेवरुन दररोज ८ लाख उपनगरीय लोकल प्रवासी प्रवास करत आहेत. परंतु सामान्यांसाठी लोकल अद्यापही खुली नाही. तर महिलांसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ व सायंकाळी ७ नंतर प्रवास आहे. अशा अनेक अडचणी अन्य प्रवाशांसमोर आहे. परिणामी अनेक जण लोकल प्रवासासाठी अत्यावश्यक सेवा कर्मचारी असलेले बनावट ओळखपत्रही बनवून घेत आहेत.

अनेक जण सीएसएमटी परिसरातील कार्यालय गाठण्यासाठी लोकलने सीएसएमटी स्थानकात उतरतात. या स्थानकात गेल्या काही दिवसांपासून सकाळपासून तिकीट तपासणीसांचा फौजफाटाच तैनात असतो. शुक्र वारी ५३८ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले.