Desh

बापरे डॉक्टरांचा निष्काळजीपणा! डॉक्टरांनी प्रसूती केली खरी पण, मात्र कपडा महिलेच्या पोटातच राहिला आणि…

By PCB Author

July 22, 2021

उत्तर प्रदेश, दि.२२ (पीसीबी) : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा मोठा प्रकार समोर आला आहे. शाहजहांपूर येथील जिल्हा महिला रुग्णालयात सिझेरियन ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांकडून गर्भवती महिलेच्या पोटात एक कपडा राहिला ज्यामुळे त्या महिलेची प्रकृती अधिकच बिकट झाली. यानंतर महिलेला लखनऊच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. ६ जानेवारी रोजी या महिलेची प्रसृती झाली होती. तेव्हापासून कपडा महिलेच्या गर्भाषयातच होता.

शाहजहांपूरमधील तिलहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर गावी राहणाऱ्या मनोज यांनी आपली पत्नी नीलम देवी गरोदर असल्याचे सांगितले. प्रसूतीसाठी पत्नीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ६ जानेवारी रोजी ऑपरेशननंतर मुलाचा जन्म झाला. काही दिवसानंतर महिलेची प्रकृती खालावू लागली. जेव्हा प्रकृती अधिकच खराब झाली तेव्हा पत्नीला २१ जूनला खासगी रुग्णालयात दाखवण्यात आलं. जिथे तिच्या गर्भाशयात एक कपडा असून आतड्याला टाके असल्याचे तपासणीत आढळले.

यानंतर नीलम देवीला लखनऊच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे नीलम देवीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर विभागीय व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे. पीडितेच्या पतीनने सांगितले की, डॉक्टरांनी ऑपरेशनपूर्वी सुविधा शुल्काची मागणी केली होती. ती नाही दिल्याबद्दल डॉक्टरांनी ऑपरेशनदरम्यान दुर्लक्ष केले आणि गर्भाशयात कापड सोडले. जखमेला धाग्याने शिवून टाकले. त्याचवेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. पूजा त्रिपाठी पांडे म्हणाल्या की, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. महिला विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे. ते चौकशी करून आपला अहवाल जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवतील असे त्यांनी म्हटले.