बापरे! जपानी कंपनीला भारतात ऑफिस सुरू करायचे आहे सांगून ‘अशी’ केली लाखोंची बनवाबनवी

0
241

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – जपानच्या कंपनीला भारतात मिनरल खरेदीसाठी ऑफिस सुरू करायचे आहे. कंपनीचे भारतातील कामकाज पहा, असे सांगून माल खरेदी व इतर कारणांसाठी 27 लाख 99 हजार 636 रुपये बँक खात्यावर घेऊन एकाची फसवणूक केली. हा प्रकार 3 ते 23 जून 2021 या कालावधीत महेशनगर, पिंपरी येथे घडला.

माधव सोपान ढमाले (वय 39, रा. महेशनगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी मंगळवारी (दि. 31) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. तोईची तकिनो या झिंग सोशल मीडिया ॲपवरील प्रोफाइलधारक, मार्क डॉनल्ड ब्रिटन, महिला आरोपी, एचडीएफसी बँकेचा खातेधारक, पंजाब नॅशनल बँकेचा खातेधारक अरुणकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने झिंग सोशल मीडियावरून फिर्यादीला मेसेज पाठवला. ओनो फार्मासिटिकल्स कंपनी लि. ओसाका, जपानचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, डिस्कवरी अँड रिसर्च असल्याचे आरोपीने फिर्यादीला सांगितले. त्यांची कंपनी हेल्थ टेक्नॉलॉजी कंपनी असून त्या ‘कंपनीला भारतात मिनरल खरेदीसाठी ऑफिस सुरू करायचे आहे. तुम्ही आमच्या कंपनीसाठी भारतातील कामकाज पाहण्यासाठी इच्छुक असाल तर आम्हाला कळवा’, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले.

फिर्यादी यांनी त्यासाठी होकार दिला. त्यानंतर पी. के. एंटरप्रायजेस, शिलॉंग, मेघालय यांच्याकडून खनिज पदार्थ विकत घ्यायचा आहे. आपण आमच्या कंपनीच्या वतीने पी. के. एंटरप्राईजेस या कंपनीशी व्यवहार पूर्ण करून घेण्यासाठी मध्यस्थीचे काम करा, असे आरोपीने सांगितले. पी. के. एंटरप्रायजेससोबत चार कोटी 50 लाख अमेरिकन डॉलर रकमेचा व्यवहार होणार आहे. त्याचे सात टक्के कमिशन आपणाला देण्यात येईल, असा एमओयू बनवून ई-मेल द्वारे फिर्यादीला पाठवला. त्यानंतर वेळोवेळी माल खरेदी व इतर कारणांसाठी आरोपींनी बँक खात्यावर 27 लाख 99 हजार 636 रुपये देण्यास सांगून फिर्यादीची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक बडेसाब नायकवडे तपास करीत आहेत.