बापरे! कोरोना मृतांचे १००० अस्थिकलश ‘या’ शहरात स्मशानातच पडून

0
191

राजकोट, दि. १४ (पीसीबी) – कोरोना मुळे मृत झालेल्या प्रेतांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या अस्थिरक्षा न्यायला त्यांचे नातेवाईक घाबरतात. गुजराथमध्ये राजकोट शहरातील स्मशानात तब्बल १००० कोरोना मृतांच्या अस्थिंचे कलश स्मशानाबाहेरील कप्यात पडून आहेत. कोरोनाची भिती नागरिकांच्या मनात बसल्याने आता अंत्यसंस्कारालाही कोणी फिरकत नाहीत आणि नंतरचे धार्मिक विधीसुध्दा होत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे.

कोरोनाचा वाढता प्रकोप आता कुटुंब, नातेवाईक आणि एकूणच समाजाला एकमेकांपासून तोडतो आहे. वाढत्या कोरोना संख्येमुळे लोकांमध्ये एक वेगळीच भीती पसरली आहे. आपल्या प्रियजनांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे अस्थिकलश घेऊन जातात. प्रत्यक्षात गेले दीड दोन महिन्यांपासून असे १००० हजार अस्थिकलश या स्मशानात पडून आहेत.

इंडिया टुडे टीव्ही प्रतिनिधीने गुजरातच्या राजकोटमधील रामनाथ पॅरा स्मशानभूमीला नुकतीच भेट दिली. एकीकडे लोक त्यांच्या प्रियजनांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी रांग लावून वाट पाहत आहेत, तर दुसऱ्या बाजूला कोणीच वाली नसल्याने हजारोने अस्थिकलश पडून आहेत.

सर्व देशभरात कोरोनाचे संकट गहिरे होत आहे. रुग्णालयातून बेडची कमतरता सर्वत्र आहे. सूरत, बडोदा, अहमदाबाद शहरांतून मृतांवर अंत्यसंस्कारासाठी स्माशानाबाहेर रांगा दिसतात. मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ मध्ये स्मशानात पाच-सहा फुटावर चिता रचून एकाच दिवशी ५७ अंत्यसंस्कार कऱणारे चित्र धडकी भरवणारे आहे. बडोद्यात २४ तास प्रेत जाळणाऱ्या तीन विद्यत दाहिन्या अक्षरशः वितळून गेल्याचे दृष्य परिस्थिती किती भयंकर आहे ते दर्शविते. एका प्रेतासाठी किमान दीड तास लागत असल्याने टोकन क्रमांक घेऊन आठ-दहा तासाने अंत्यसंस्कार होत आहेत.

राजकोट स्मशानातील परिस्थितीसुध्दा खूपच गंभीर आणि जीवाला चटका लावणारी आहे. एकदा शरीरावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अगदी क्वचितच नातेवाईक अस्थिरक्षा गोळा करण्यासाठी परत येतात. रामनाथ पॅरा स्मशानभूमीच्या व्यवस्थापकाने सांगितले की, गेल्या तीन महिन्यांत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अशा लोकांच्या १००० अस्थिकलशांना त्यांच्या नातेवाईकांची प्रतिक्षा आहे. “राख गोळा करण्यास लोक घाबरतात. त्यांना वाटते की त्यांना हाडांमधून कोरोनाची बाधा होईल.”