बापरे ! आता यूपी-बिहारनंतर आता ‘या’ नदीमध्ये मृतदेह; ग्रामस्थांनी घेतला धसका

0
318

मध्य प्रदेश, दि.१२ (पीसीबी) : कोरोनाने जगभर थैमान घातलेले असताना करोना संक्रमणा दरम्यान नदीच्या पाण्यात मृतदेह तरंगताना आढळण्याच्या घटनांत वाढ होताना दिसतेय. कारण, आता उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर आता मध्य प्रदेशातही नदीच्या पाण्यावर मृतदेह तरंगताना आढळले असून मध्य प्रदेशातल्या पन्नामधल्या रुंज नदीत हे मृतदेह अक्षरशः सडलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये खूप भीतीचे वातावरण पसरले आहे. पन्ना जिल्ह्यातून वाहणाऱ्या केन नदीला येऊन मिळणाऱ्या रुंज नदीत मृतदेहांचा ढीग पडलाय. पन्ना जिल्ह्याच्या नंदनपूर गावाजवळ हे मृतदेह किनाऱ्यावर येत आहेत.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास सहा मृतदेह आढळून आले असून या नदीच्या पाण्यात आणखीही मृतदेह असल्याचा संशय तेथील स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. गेल्या तीन चार दिवसांपासून मृतदेह सापडण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. परंतु, अधिकाऱ्यांकडून मात्र कोणतीही हालचाल झाली नसल्याची ग्रामस्थांनी तक्रार केलीय. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ त्यांचा मृतदेह जाळण्याऐवजी नद्यांमध्ये सोडून देत असल्याची भीती या ग्रामस्थांकडून व्यक्त केली जातेय. कारण, रुंज नदी पन्ना जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत पुढे जाते. त्यामुळे हे मृतदेह पन्ना जिल्ह्यातील असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बिहारच्या बक्सरमध्येही गंगा नदीतून जवळपास ७० हुन अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले तर उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरमध्ये गंगा नदीच्या तटावर काही मृतदेह तरंगताना आढळून आले होते.