बाणेरमध्ये ब्रेक लावल्याने दुचाकीस्वाराची कॅब चालकाला मारहाण

0
485

हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) – समोरच्या कारने अचानक ब्रेक दाबल्याने कॅब चालकाने देखील ब्रेक लावला. यावरून बाजूने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने कॅब चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.१८) सकाळी अकराच्या सुमारास देहूरोड – कात्रज बाह्यवळण महामार्गावर बाणेर येथे घडली.

याप्रकरणी कॅबचालक संजय विठ्ठल पिंगळे (वय ३९, रा. तुंबडेनगर, दहिसर पूर्व, मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मंगळवारी सकाळी कॅबमधून प्रवाशांना सोडण्यासाठी बाणेर येथे जात होते. बाणेर फाट्याजवळ आले असता त्यांच्या समोरील एका मोटारीने अचानक ब्रेक लावला. यामुळे संजय यांनाही अचानक ब्रेक लावावा लागला. दोन्ही मोटारी अचानक थांबल्या. याचवेळी संजय यांच्या मोटारीमागून एक दुचाकीस्वार (एमएच/१२/जीई/९९३०) जात होता. संजय यांची मोटार अचानक थांबली म्हणून दुचाकीस्वाराने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर संजय मोटारीतील प्रवाशांना सोडण्यासाठी बाणेर येथे गेले. दुचाकीस्वाराने तिथे येऊनही संजय यांना दगडाने मारहाण केली. फौजदार नामदेव अंगज तपास करत आहेत.