Maharashtra

बाजार ते लग्न… गर्दीत जाणं टाळा; महापौर किशोरी पेडणेकरांचं मुंबईकरांना कळकळीचं आवाहन..

By PCB Author

January 04, 2022

मुंबई , दि. ४ (पीसीबी) – मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बाजार असो की लग्न… स्वत:हून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं कळकळीचं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं आहे. लग्न समारंभ झाले पाहिजे. पण ते नियमात होऊ द्या. गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित असे सोहळे करा. तसेच स्वत:हून लग्नापासून ते बाजारापर्यंत गर्दीच्या ठिकाणी स्वत: हून जाणे टाळा, असं आवाहन महापौर पेडणेकर यांनी केलं.

शिवसेनेने स्वत: दोन मोठे कार्यक्रम रद्द केले आहेत. इतर पक्षांनीही गर्दी होणार नाही असे कार्यक्रम होऊ देऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच ओमिक्रॉनला घाबरू नका. लक्षण आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, असंही त्या म्हणाल्या. लॉकडाऊन असताच कामा नये. कारण आता सर्व सावरत आहेत. पुन्हा लॉकडाऊन होऊ नये म्हणून सावध झालं पाहिजे. सुपर स्प्रेडर होऊ नका. मास्क लावा, वॉशेबल मास्क वापरला तरी चालेल. ती काळजी घेतली तर लॉकडाऊन लागणार नाही. कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. 20 हजाराचा आकडा येऊ देऊ नका. दुसरी लाट आपण थोपवून जिंकलो. आता ही लढाईही तुमच्या सहकार्याने जिंकायची आहे. आपण ही लढाई जिंकू शकतो. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री कोरोनासंदर्भात जनतेशी बोलतील, असं त्यांनी सांगितलं. शाळा बंद करण्याचा निर्णय योग्यच असल्याचं सांगतानाच इयत्ता पहिली ते नववीचे वर्ग ऑनलाईन सुरू राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना रोखण्यासाठी सोसायट्यांसाठी महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या विंगमध्ये 20 टक्के किंवा त्यापेक्षा कोविड बाधित रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करण्यात येणार आहे. आतापर्यंत 10 टक्के पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येत होती, असं त्यांनी सांगितलं.