बांबूच्या बॅटचा प्रयोग फेल; बॅट लाकडाचीच हवी

0
349

लंडन, दि. १२ (पीसीबी) – बॅट आणि बॉल यातील समतोल साधण्याचा दाखला देत क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरिलीबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) बांबूपासून बॅट निर्मितीला आधीच छेद दिला. क्रिकेट नियमाप्रमाणे बॅट ही लाकडाचीच असली पाहिजे, असे त्यांनी नियमाकडे बोट दाखवून म्हटले आहे.

ही बॅट वापरात येण्यापूर्वीच ती बेकायदेशीर असल्याचे क्लबने जाहिर केले असले, तरी त्यांनी या प्रयत्नांना थेट नाकारलेले नाही. आतापर्यंत पाच वेळा बॅटच्या आकारावर बंधने घालण्यात आली. पण, पाचही वेळी त्याचा वापर झाल्यावर बंधने घालण्यात आली होती. बांबूची बॅट वापरात येण्यापूर्वीच त्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे क्लबने या मुद्यावर क्लबच्या कायदा उप समितीच्या बैठकीत चर्चा होईल असे म्हटले आहे.

बांबूची बॅट अधिक टणक असणार आणि त्यावर कठिण फटकेही खेळणे सोपे जाणार असा संशोधक दर्शिल शहा यांचा दावा आहे. ही बॅट स्वस्त असणार हा भाग निराळा. पण, त्यामुळे आधीच फलंदाजीकडे झुकलेले अलकिडचे क्रिकेट या बॅटमुळे अधिक फलंदाजीमय होईल आणि गोलंदाजांना अर्थच राहणार नाही ही भिती निश्चित रास्त आहे. बॅट आणि बॉल यामध्ये समतोल राखणे आवश्यक आहे. त्यामुळेच नियम ५.३.२ यानुसार बॅट ही लाकडाचीच असायला हवी.

आता आपण आजपर्यंत वापरावर बंदी घालण्यात आलेल्या बॅटची माहिती घेऊ –

monster biggest batमॉन्सटर बॅट १७७१ – क्रिकेटमध्ये सर्वप्रथम बॅटच्या आकारावरून १७७१ मध्ये गहजब झाला. तेव्हा आतंरराष्ट्रीय क्रिकेट आस्तित्वात फार तर येऊ लागले असे म्हणूयात. पण, क्रिकेटला नियम नव्हते. चेर्टसे वि. हॅम्बल्टन हा सामना सुरू होता. थॉमस व्हाईट या चेर्टसे संघाच्या फलंदाजाने भली मोठी बॅट घेऊन मैदानावर प्रवेश केला. या बॅट मुळे संपूर्ण विकेट झाकले जात होते. गोलंदाजाने कितीही प्रयत्न केला, तरी तो त्याला बाद करू शकणार नाही. तेव्हा हॅम्बल्टन संघाचा गोलंदाज ब्रेट याने पुढाकार घेतला आणि तक्रार केली. त्यानंतर कर्णधार रिचर्ड निरेन याने याचिका दाखल केली. अर्थात, यानंतरही चेर्टसे २१८ धावांच्या आव्हानाचा सामना करताना एका धावेने हरले. पण, यासामन्याने क्रिकेटच्या बॅटला ४.२५ इंच रुंद हा आकार मिळाला. त्यानंतर आजपर्यंत अनेकस्थित्यंतरे आली. पण, तेव्हापासून बॅटच्या ब्लेडमध्ये असलेले नियम आजही कटाक्षाने पाळले जातात. बॅटची लांबी ३८ इंच (९६५ एम.एम.), रुंदी ४.२५ इंच (१०८ एम.एम.), सर्वांगिण खोली २.६४ इंच (६७ एम.एम.), कडा १.५६ इंच (४० एम.एम.) इतक्या असतात. याच्या बाहेर तयार झालेली किंवा याच आकारावर वेगळ्या प्रक्रिया केलेल्या बॅट आयसीसीने नाकारल्या आहेत.

lillee and aluminium batअॅल्युमिनियम बॅट – क्रिकेटच्या बॅटला निश्चित आकार येत नाही, तोच आठ वर्षात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गेलंदाज डेनिस लिलीने चक्क अॅल्युमिनियमच्या बॅटचा वापर केला. अॅशेस मालिकेतील पहिल्याच कसोटीच्या पहिल्या दिवशी १५ डिसेंबर १९७९ रोजी ऑस्ट्रेलिया ८ बाद २३२ असे अडचणीत होते. लिली ११ धावांवर नाबाद होता. पण, दुसऱ्या दिवशी हे महाशय चक्क अॅल्युमिनियमची बॅट घेऊन फलंदाजीला अवतरले. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. अर्थात, त्या दिवसापूर्वी १२ दिवस लिलीने विंडीजविरुद्ध अशीच बॅट वापरली होती. पण, कुणी आक्षेप घेतला नाही.

या वेळी मात्र सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया कर्णधार ग्रेग चॅपेल याने लिलीला बॅट बदलायला सांगितली. बोथमचा एक चेंडू फटकारल्यावर लिलीने तीन धावा घेतल्या. पण, फटक्यात जोर नव्हता. अॅल्युमिनियमच्या बॅटने त्याला वेग मिळाला नाही. चॅपेलच्या मते तो चौकार जायला हवा होता. त्याने लिलीला बॅट बदलायला सांगितली. पण, त्याने बदली नाही. पुढे इंग्लंड कर्णधार माईक बिअर्ली याने अनेकदा पंचाकडे चेंडू लवकर खराब होत असल्याच्या तक्रारी केल्या. सरते शेवटी चॅपेलनेच राखीव खेळाडूकडून बॅट मागावून ती पारंपरिक लाकडी बॅट लिलीच्या हातात दिली. तेव्हा लिलीने काहिशा नाराजीने अॅल्युमिनियमची बॅट मैदानावर भिरकावून दिली.

ponting with batग्रॅफाईट बॅट – बॅटच्या मागील बाजूला ग्रॅफाईटची पट्टी लावून बॅट अधिक मजबूत करण्याचा घात कुकाबुरा कंपनीने केला. तशी बॅट ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिगने सर्वप्रथम वापरली. त्याने २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध द्विशतक साजरे केले. तेव्हा चर्चा सुरू झाल्यावर मेरिलीबोन क्लबने ही बॅट नियम ६ ला धरून नसल्याचा निर्णय देत बॅटवर बंदी आणली. नियम ६.२ नुसार चेंडू खराब होणार नाही असे मटेरियल वापरावे बंधनकारक आहे. कुकाबुराने या निकषाचा विरोध केला. पण, मेरिलीबोन क्लबने केलेल्या नियमाशी बांधिल आहोत, असे सांगत बॅटचे उत्पादन थांबवले. नुसतेच थांबवले नाही, तर त्यांनी पॉटिंगला लगोलग नव्या बॅट पाठवल्या आणि त्या बॅट परत घेतल्या. तेव्हा पॉंटिंग दक्षिण आफ्रिकेत मालिका खेळत होता.

mongoose batमुंगुस बॅट – छोट्या ब्लेडच्या या बॅटचा वापरही ऑस्ट्रेलियाकडूनच झाला. सलामीचा फलंदाज मॅथ्यू हेडन याने सर्व प्रथम २०१९ आयपीएलमध्ये या बॅटचा वापर केला. फटकेबाजीला सहज असलेल्या या बॅटचे तेव्हा खेळाडूंनी आपापसात स्वागत केले. पण, यामुळे गोलंदाजाचे महत्व कमी होणार असा निकष लावून या बॅट वर बंदी घालण्यात आली.

gayle golden batगोल्डन बॅट – हा बॅटचा आकार बदलण्याचा भाग नव्हता. हा बॅटच्या रंगाचा भाग होता. बॅटचा रंगही कधी कधी त्रासदायक होतो. या वेळी अशा सोनेरी रंगाच्या बॅटचा वापर विंडीजच्या ख्रिस गेलने केला. विशेष म्हणजे त्याच्यासाठी अशा बॅट भारतातून तयार होऊन ऑस्ट्रेलियात गेल्या. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये गेलने ही बॅट वापरली. अनेकांनी त्यावर मेटल पट्टी बसवल्याची तक्रार केली. पण, ती फोल ठरली. मात्र, बॅटच्या चकाकत्या रंगाचा प्रकाशझोतात खेळताना अडथळा होतो हे निकष लावून या बॅटवर बंदी घालण्यात आली.

russell black batब्लॅक बॅट – गेलच्या गोल्डन बॅट प्रमाणे विंडीजच्याच आंद्रे रसेल याने बिग बॅशमध्येच पूर्ण काळ्या रंगाची बॅट वापरली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रथम परवानगी दिली. पण, पुढे बॅटच्या काळ्या रंगाचे ठसे व्हाईट चेंडूंवर पडू लागल्याची तक्रार आल्यावर त्यांनी या बॅटच्या वापरावर बंदी आणली.