Chinchwad

बहिणीची छेड काढल्याने काळेवाडीतील तरुणाचा खून; दोघांना अटक

By PCB Author

January 31, 2019

काळेवाडी, दि. ३१ (पीसीबी) – बहिणीची छेड काढल्याच्या रागातून दोघांनी मिळून काळेवाडीतील तरुणाचा दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर मृतदेह वारजे येथील स्मशानभूमीजवळ मुठा नदीपात्रात फेकून दिला होता. या घटनेचा उलगडा करण्यात वारजे पोलिसांना यश आले आहे.

कृष्णा गिराव सोनावणे (वय २२, रा. आदर्श नगर, काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. इर्शाद महंमद शेख (वय २८), सोमनाथ उर्फ सोमा पांडुरंग थोरात (वय २७, रा. स्वामी समर्थ कॉलनी, तापकीर नगर, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कृष्णा काळेवाडी येथे फॅब्रिकेशनचे काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो हरवला असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. कृष्णाने सोमनाथ याच्या बहिणीची छेड काढली होती. या कारणावरून ईशाद आणि सोमनाथ या दोघांनी दारू पिऊन कृष्णा याचा गळा दाबून आणि डोक्यात दगड मारून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी छोटा हत्ती (एमएच/१४/ ईएम/५७९५) मधून कृष्णाचा मृतदेह नेऊन वारजे येथे स्मशानभूमीजवळ नदीपात्रात फेकून दिला.

रविवारी (दि.२०) जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास कृष्णाचा मृतदेह वारजे पोलिसांना मिळाला. त्यांनी तपास करून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी आणि त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.