Pimpri

बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशाचा मृत्यू

By PCB Author

June 28, 2021

मोशी, दि. २८ (पीसीबी) – प्रवासी खाली उतरत असताना एसटी बसला झटका देऊन पुढे नेली. यामुळे प्रवासी रस्त्यावर पडून त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मोशी येथे रविवारी (दि. 27) पहाटे घडली.

गणेश मधुकर साबळे (रा. लोणीकंद, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. भगवानदास बॉर्डर यादव (वय 51, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे मृत्यु झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा ओमप्रकाश भगवानदास यादव (वय 21) यांनी रविवारी (दि. 27) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास मयत भगवानदास हे एसटीने मोशी येथे आले. ते जकात नाका चौक, मोशी येथे बस मधून उतरत असताना एसटी बस चालकाने ‘स्टॉप आला आहे, लवकर खाली उतरा’, असे म्हणून मयत भगवानदास यांना घाई केली. भगवानदास बसमधून खाली उतरत असताना आरोपीने बस पुन्हा पुढे नेऊन गाडीला झटका दिला. त्यामुळे भगवानदास यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्‍याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. या प्रकरणी आरोपी बस चालक साबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.