बलात्कारातील आरोपीला वाचवण्यासाठी जबाब बदलल्यास खटला चालणार : सुप्रीम कोर्ट

0
441

दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – बलात्काराच्या कोणत्याही प्रकरणात पीडित महिला अथवा पुरुष व्यक्तीने आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्यास त्यासाठी आपला जबाब बदलल्यास अशा व्यक्तीवरही खटला चालवण्यात येईल, असे एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

२००४ मध्ये एका ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. यावेळी पीडितेने आपल्या आईच्यासोबत पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आरोपीविरोधात एफआयआर नोंदवली होती. यासाठी पीडितेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली होती. त्याचबरोबर ओळख परेड दरम्यान पीडितेने आरोपीला ओळखलेही होते. मात्र, सहा महिन्यांनंतर कोर्टासमोर पीडित मुलीने आपला जबाब बदलला. त्यामुळे सत्र न्यायालयाने आरोपीला निर्दोष ठरवत मुक्त केले होते.

मात्र, त्यानंतर गुजरात हायकोर्टाने सत्र न्यायालयाचा निर्णय बदलत पीडितेचे वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले होते. त्यानंतर हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात आरोपीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तिथे आरोपीची याचिका फेटाळण्यात आली. यामध्ये गुजरात हायकोर्टाने सादर केलेल्या पुराव्यांची शहानिशा केल्यानंतर सुप्रीम कोर्टात सांगितले की, बलात्कारीत पीडित मुलगी ही गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे तिच्यावर आरोपीने दबाव टाकल्यानेच तिने आपला जबाब बदलला. त्यामुळेच कोर्टाने विशेष टिपण्णी करताना म्हटले की, जर बलात्कार पीडित व्यक्तीने कोणत्याही दबाखाली येऊन आपला जबाब बदलल्यास कोर्ट शांत बसणार नाही. हे केवळ अशाच खटल्यांमध्ये लागू होईल ज्यात आरोपीविरोधात आवश्यक पुरावे असतानाही पीडित व्यक्ती आपला जबाब बदलून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करेल.