‘बर्ड फ्लू पसरवण्यासाठी शेतकरी आंदोलक बिर्याणी खात आहेत’; भाजपा आमदारच वादग्रस्त वक्तव्य

0
228

जयपूर, दि.१०(पीसीबी) : राजस्थानच्या कोटाचे भाजपचे आमदार मदन दिलावर यांनी दिल्लीच्या सीमेवरील आंदोलकांचे शेतकरी विरोधक विकृत मानसिकता असल्याचे वर्णन करणारा एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. चळवळीच्या नावाखाली हे लोक सहलीला आले असल्याचे वादग्रस्त विधान या भाजप आमदाराने केले आहे. शिवाय शेतकरी बिर्याणी खाऊन बर्ड फ्लू पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

जवळपास दोन मिनिटांच्या व्हिडिओ संदेशामध्ये दिलावर हे म्हणतात की “हे शेतकरी आंदोलनकर्ते आहेत. पण हे आंदोलनकर्ते कशासाठी आहेत? जी बिल शेतकऱ्यांसाठी आणली गेली आहेत ती रद्द करावीत जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू नये. हे शेतकरी देशाची चिंता करीत नाहीत, देशातील जनतेचीही यांना काळजी नाही. त्यांच्यासाठी हे आंदोलन सहलीसासारखे आहे. चिकन बिर्याणी खात आहेत, काजू बदाम खात आहेत, वेगवेगळ्या मार्गांनी तेथे येत आहेत, यामध्ये तेथे दहशतवादी देखील असू शकतात. त्यात चोर दरोडेखोरही असू शकतात. काही शेतक्यांनाही शत्रू असू शकतात. या सर्व लोकांना देशाचा नाश करायचा आहे.”

भाजपाचे आमदार येथे थांबले नाहीत. ते म्हणाले, “चिकन बिर्याणी खाल्ल्याने, बर्ड फ्लूचा प्रसार करण्याचा हा डाव आहे असे मला वाटते. केंद्र सरकारने जर यांना आत्ताच थांबवलं नाही तर ते देशात मोठे आंदोलन घडवू शकतात याची मला भीती आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे की या आंदोलकांना त्वरित थांबवा. ते रस्त्यावर बसून लोकांना त्रास देत आहेत.”

राजस्थानच्या कॉंग्रेसचे प्रमुख गोविंदसिंग डोटासरा यांनी भाजप आमदाराच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करत यास लज्जास्पद भाष्य म्हंटले आहे. त्यांनी आपला व्हिडिओ संदेश शेअर केला आणि लिहिले की, “भाजप, राजस्थानचे आमदार मदन दिलावर जी यांनी शेतकऱ्यांसाठी दहशतवादी, दरोडेखोर शब्द वापरणे लज्जास्पद आहे. ज्याने आपल्याला पोटभरून खायला घातलं त्यांच्या आंदोलनाला तुम्ही सहल म्हणता आणि ते बर्ड फ्लूसाठी जबाबदार आहेत असं म्हणता? तुमचे हे विधान भाजपाच्या विचारसरणीला प्रतिबिंबित करते.”